पोलिस ठाण्यासमोर भरवला जुगार अड्डा


सातारा :सातारा पोलिस मुख्यालय परिसरात व शहर पोलिस ठाण्याच्या समोर जुगाराचा अड्डा भरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी जुगाराचा अड्डा उधळला. पोलिसांनी चौघांना अटक करत मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांच्या नाकावरच टिच्चून जुगार खेळला जात असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.

शामसुंदर महादेव लोकरे (वय ५८, रा.गोडोली), रामचंद्र भानु माने (वय ४४, रा.मंगळवार पेठ), सुरज चंद्रकांत रोकडे (वय २१, रा.संभाजीनगर), सुरज भानुदास मोरे (रा.करंजे) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत. त्यावर आळा बसावा, यासाठी पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना बेकायदा व्यवसाय बंद करण्याबाबत सक्त ताकीद दिली आहे.

असे असतानाच शनिवारी सायंकाळी उशीरा पोलिस मुख्यालयाशेजारी व सातारा शहर पोलिस ठाण्याच्या समोर बिनधोकपणे जुगार खेळला जात असल्याचे काही सुजाण नागरिकांच्या लक्षात आले. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अवघ्या एक अर्ध्या तासाच्या त्याठिकाणी पोलिसांचे पथक पाठवले.

मल्हार पेठेतील भवानी मंदिराच्या परिसरात हा जुगाराचा अड्डा सुरु होता. हे ठिकाण शहर पोलिस ठाण्याच्या लॉक रुमच्या विरुध्द दिशेला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहिले असता जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळल्या. घटनास्थळाची पाहणी केली असता त्याठिकाणाहून रोख २ हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी एलसीबीचे पोलिस हवालदार मुबीन मुलाणी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

No comments

Powered by Blogger.