४० कोटी येऊनही महू-हातगेघरचे काम रखडलेलेच


कुडाळ : 
युती शासनाच्या काळात सत्ताधारी असताना 21 वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या महू-हातगेघर धरणाचे काम अजूनही रखडले आहे. या धरणासाठी 40 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतरही दुरुस्तीचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. भाजप सरकारच्या काळात तर येथील दगडसुध्दा हललेला नाही. या जन्मात तरी महू हातगेघर धरण पूर्ण होईल का? जावलीच्या शेतशिवरात पाणी फिरेल का? असा संतप्‍त सवाल जावलीची जनता सवाल विचारत आहे.गत वर्षी महू धरणावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधी पुनर्वसन मगच धरण या मुद्यावर धरणाचे काम बंद पाडून साखळी उपोषण केले. त्यानंतर तिथंंच धरणाच्या भिंतीखाली भाजप सरकारचे प्रतिनिधी म्हणून भाजपच्या नेत्यांनी 40 कोटींचा निधी मंजूर म्हणून डंगोरा पिटत आघाडी सरकार किती निष्क्रिय होतं, आम्ही किती चांगलं आहोत याचा राजकीय स्टंट मांडला होता. मात्र, त्यानंतर सबकुछ गायब. निधी 40 कोटी आला पण धरणाची पाच फुट भिंत सुद्धा पूर्ण करता आली नाही.


वर्षभर ‘नाव लाव, टिमकी बजाओ’ अशी अवस्था त्या 40 कोटीच्या निधीची झाली. अवघ्या पाच-सहा कामगारांवर 40 कोटीच्या निधीचा काम त्या ठिकाणी सुरू राहिलं आणि तीन महिन्यातच पुन्हा बंद पडले. चार-दोन कामगार 40 कोटीचे धरणाचे काम सुरू झालं असे दाखवण्यात आले चार दोन पोकलॅड मशिन आल्या आणि ढीग भर वाळू काढून गेल्या. झालं धरणाचं काम? संपला निधी?

40 कोटींचा निधी आला म्हणून गावभर डांगोरा पिटणारे अवघ्या तीन महिन्यातच गायब झाले. जावली सुजलाम् सुफलाम् होण्याच्या विकासाच्या गप्पा धरणाच्या पाण्यात तिथेच बुडाल्या. पुनर्वसनाची कामे झालीच नाहीत. भाजप व राष्ट्रवादीच्या धरणाच्या भिंतीवर झालेल्या दोन्ही शामियान्यात धरणग्रस्तांचे प्रश्‍न ज्या ताकतीने उसळले तितक्याच ताकतीने ते गायब झाले. दोन्ही शामियान्यात जावलीचे प्रश्‍न होते. परंतु, राजकीय लोकनाट्यात एक डाव भुताचा प्रमाणे सर्व काही नाहीसे झाले.

रेड्डी नावाच्या ठेकेदाराने काम घेतलं मात्र ते काम ठेकेदाराच्या माध्यमातूनच त्याचा बाजार केला. अनेकांना स्वप्न दाखवली, त्याचीही रात गयी बात गयी अशी अवस्था झाली. तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महू हातगेघर धरण हा महत्वकांक्षी प्रकल्प सेना भाजप युती सरकारच्या काळात सुरू झाला. त्यानंतर तो पंधरा वर्षेेे रखडला. प्रारंभी युतीच्या काळात 70 टक्केहून जास्त काम करण्यात सरकारला यश आले. परंतु जावलीकर जनतेचे दुर्भाग्य असे की नंतरच्या काळात पावरफुल सत्ताधीश सत्तेेवर आले. कुरघोड्यांचा राजकारणामुळे तेही रखडले. सुधारित प्रस्ताव मान्यतेच्या भानगडीत आघाडी सरकारची मानसिकता असून देखील राजकारणापायी तेही रखडले. 4 विधानसभा होऊन गेल्या. येणार्‍यांनी अनेक प्रलोभने आणि भूलथापा यांच्या जोरावर निवडणुका जिंकल्या हरल्या मात्र महू हातगेघर धरण पूर्ण झालेच नाही.

निवडणुका आल्या की महू हातगेघर धरणाचा पुन्हा विषय चव्हाट्यावर येतो आणि मग धुरळा खाली बसला की महू धरण विषय ही पाण्यातच विसर्जित होतो. जावलीतील जनतेचा विकास व्हावा यासाठी हे प्रकल्प तडीस नेणे अत्यंत गरजेचे होते. मात्र, याची मानसिकता कुठंच दिसून आली नाही. 21 वर्षांचा वनवास भोगायला लावणारे नेमके कोण? याचे उत्तर आज पर्यत जनतेला कधीच मिळाले नाही.

आता युती शासनाचे सरकार आहे 40 कोटी निधीही दिला आहे. विकासासाठी सर्व सामग्री आहे.परंतु, सरकारची मानसिकता त्या ठिकाणी दिसून येत नाही. युतीच्या राज्यातील नेत्यांनी जर खर्‍या अर्थाने मनात आणले तर हे प्रकल्प पूर्णत्वास जाईल. जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री दर्जाचे नेते ना. नितीन बानुगडे-पाटील यांना कृष्णा खोर्‍याचे उपाध्यक्ष पद मिळाले आहे. जावलीच्या इतिहासाबाबत महाराष्ट्रभर त्यांच्या तोंडून इतिहास सांगितला जातो. जावलीच्या जनतेची खरी परिस्थिती काय आहे हे त्यांना नक्की माहित आहे. आता 40 कोटी निधीच्या बाबतीत त्यांना नक्की माहीत असणार.त्यामुळे महू हातगेघर धरणाचे काम त्यांनी मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे. 

आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही महू हातगेघर धरणासाठी व त्याच्या पूर्णत्वासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नानेही धरणाला मुर्त रुप आलेच नाही. राजकीय आरोप प्रत्यारोपात जावलीची जलवाहिनी महू-हातगेघर धरण नेहमी होता होता राहिले. त्यात श्रेय वादाच्या राजकारणात ते अनेकवेळा अडकलं. आता जनता ‘तुम्हा मायबापाच्या पाया पडतो, आमच्या जमिनी कालव्यात गेल्या, पण निदान ज्या वाचल्या त्या धरणीला पाणी तरी मिळवून द्या’ असे म्हणत आहे.

No comments

Powered by Blogger.