Your Own Digital Platform

पै. खाशाबांना पद्मभूषण देण्यास भाग पाडू : राजू शेट्टी


शेणोली : पेट्रोल पंपावर तेल भरणार्‍या मुलाला केंद्र सरकार पद्मश्री देते. सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळावा यासाठी मागण्यांचा रेटा लागतो, पण अनवाणी ऑलिम्पिकमध्ये जाऊन स्वातंत्र्य भारतास पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांची पद्मभूषण सन्मानापासून उपेक्षा का? जनसामान्यांची भाषा राज्यकर्त्यांना समजत नसेल तर त्यांच्या मानगुटीला धरुन खाशाबा जाधवांना पद्मभूषण देण्यास भाग पाडू, असा घणाघात खा. राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर केला. गोळेश्‍वर (ता. कराड) येथे कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हिंदकेसरी पै. संतोष वेताळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, धनाजी शिंदे, सावकार मादनाईक, विठ्ठल मोरे, रणजीत जाधव, सुदाम चव्हाण, अनिल घराळ, सरपंच राणी जाधव, उपसरपंच प्रदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

खा. शेट्टी म्हणाले, पै. खाशाबा जाधव यांचा उचित सन्मान करण्यामध्ये केंद्र व राज्य सरकार कमी पडले आहे. सचिन तेंडुलकरच्या भारतरत्नसाठी देशभर मागण्यांचा रेटा तयार होतो. खाशाबा जाधव हे सचिन तेंडूलकरपेक्षा तसुभरसुध्दा कमी नव्हते. ते खेड्यातील होते म्हणून त्यांना दुर्लक्षित केले का, असा आमच्या मनामध्ये प्रश्‍न आहे. खाशाबा जाधवांना पद्मभूषण मिळवण्यासाठी मी दहा वर्षांपासून प्रयत्न करत आहे.

काँग्रेसच्या काळात तत्कालिन गृहमंत्री पी. चिदंबरंम यांच्याकडे मी पाठपुरावा केला. त्यांनी दोन ओळीच्या पत्रात सांगितले की, हयात नसणार्‍या व्यक्तीस सदरचा पुरस्कार दिला जात नाही. धिरुभाई अंबानींना हयात नसताना 12 वर्षानंतर पुरस्कार दिला गेला. सरकारचे धोरण बदलल्यानंतर मी याकामी पंतप्रधानांकडे पाठपुरावा केला. तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनदरबारी पै. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जो पर्यंत पै. खाशाबा जाधव यांच्या कार्याचा यथोचित सन्मान होत नाही तो पर्यंत हा लढा सुरू राहील. खाशाबा जाधव यांचे कुस्ती खेळातील योगदान विसरता येणार नाही. यावेळी प्रदीप जाधव यांनी स्वागत केले. रणजीत जाधव यांनी आभार मानले.