काँग्रेस आणि भाजपात विकासकामावरून आरोप-प्रत्यारोप


कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे नेते नामदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या गटात वारुंजी (ता. कराड, जि. सातारा) येथील विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठपुरावा केल्याने, विधानपरिषद सदस्य तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि जिल्हा परिषद सदस्य मंगल गलांडे व पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्याशी सेस फंडातून वारुंजी येथे विविध विकास कामांसाठी ३ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर झाल्याचा दावा काँग्रेस समर्थकांनी केला आहे.

 विशेष म्हणजे या विकास कामांना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत नुकताच प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी भाजप नेत्यांवर कडाडून टीका केली आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण गटाकडून केवळ श्रेयवादासाठी आम्ही मंजूर करून आणलेल्या विकासकामांची उद्घाटने केली जात आहेत. गावचे सरपंच यांच्यासह बारा ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून खोटी आकडेवारी देऊन ग्रामस्थांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा डॉ. अतुल भोसले गटाकडून करण्यात आला आहे. 

वारुंजी - केसे - पाडळी या रस्त्याच्या मजबुतीकरणासह डांबरीकरणासाठी नामदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे डॉक्टर अतुल भोसले यांनी ग्रामस्थांसह पाठपुरावा केला होता. त्यामुळे डॉक्टर अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २ कोटी ७४ लाख निधी रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाला आहे. तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी १८ लाख असा एकूण २ कोटी ९१ लाखकांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाकडून विकास निधीचे खोटे आकडे सांगितले जात असून त्यांच्याकडून ३ कोटी १७ लाख रुपयांचा निधी स्वतःच्याच प्रयत्नातून मंजूर झाल्याचा कांगावा सुरू करण्यात आल्याचा दावा पत्रकाद्वारे डॉक्टर अतुल भोसले समर्थकांनी केला आहे. 

त्याचबरोबर जे काम सरपंच यांच्या शिफारशीने मंजूर झाले होते, त्या कामाचेही श्रेय लाटण्याचा आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाकडून केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याची टीका डॉक्टर अतुल भोसले समर्थकांकडून करण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.