गचाळ कारभाराने सहकार चळवळीला घरघर


वाखरी : अलिकडील काही वर्षात अनेक सहकारी संस्था गचाळ व्यवस्थापनाने अडचणीत आल्या आहेत तर काही संस्था अवसायनात निघताहेत. महाराष्ट्रातील सहकार चळवळ अडचणीत आली असून तिचे पुनर्जीवन करुन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात सहकार चळवळीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी शासनाने कालबध्द कार्यक्रम आखण्याची मागणी होत आहे.‘विना सहकार नही उद्धार’, हे ब्रीदवाक्य आज बहुतेक ठिकाणी नावालाच उरले असून सहकारी तत्वावर महाराष्ट्रातील थोर नेत्यांनी काढलेले साखर कारखाने व्यवस्थापनातील गैरकारभाराने अखेरच्या घटका मोजत आहेत.

महाराष्ट्रात अलिकडे साखर कारखान्यांचे उदाहरण घेतले तरी सभासदांना पुरेसा भाव मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. सहकार क्षेत्र नष्ट होत असल्याचे चित्र आज दिसून येत असून राज्यातील अनेक साखर कारखाने, बँका, पतसंस्था, बँका व अन्य संस्था भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या आहेत. यातून अनेकांनी करोडो रुपयांची माया जमवून सहकाराची वाट लावली आहे. हे जरी खरे असले तरी सहकार मोडित काढून राज्य खाजगीकरणाकडे वाटचाल करू लागले आहे.

अनेक साखर कारखाने डबघाईला आले असून सहकारी तत्वावरील साखर कारखाने अडचणीत आल्याने खाजगी मालकांना विकले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीला घरघर लागली आहे. ज्यांनी सहकार मोडीत काढला किंवा गैरकारभार केला अशांना जरूर शिक्षा झाली पाहिजे.

ज्या मराठी राज्यात स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतरावदादा पाटील, स्व. पंजाबराव देशमुख, स्व. वसंतराव नाईक आदी सहकार महर्षींनी महाराष्ट्रात सहकाराचे रोपटे लावले, त्याचा वटवृक्ष झाला पण, तोच सहकार आज कोलमडून पडला आहे. आज अनेक सहकारी दूध संघ तसेच खरेदी विक्री संघ बंद पडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. महाराष्ट्रातील सहकाराला गतवैभव मिळण्यासाठी शासनाने कालबध्द कार्यक्रम आखण्याची मागणी जनतेतून होत आहे.

No comments

Powered by Blogger.