दुकान पाडण्यासाठी खासदार येतात, ही सुपारी नव्हे का? : आ. शिवेंद्रराजे


सातारा : राजघराण्याच्या तत्त्वांची काळजी आहे तर, एवढे एकच नको, गाडी काढा आणि तुमच्या लोकसभा मतदारसंघातील सर्वच दारू दुकाने बंद करा. ज्या पालिकेत त्यांची सत्ता आहे, त्या सातारा शहरात किती बोंबाबोंब सुरू आहे, हे पाहायला उदयनराजेंना वेळ नाही. सातारा शहर सोडा संपूर्ण मतदारसंघात काय समस्या आहेत, दुष्काळामुळे लोक होरपळत आहेत, याचे त्यांना काहीही देणेघेणे नाही; पण खुटाळेची जागा मात्र त्यांना महत्त्वाची वाटते. दुकाने पाडणे आणि जागा मोकळ्या करून देण्यासाठी खासदार जात असतील तर, याला सुपारी घेणे म्हणायचे नाही तर काय म्हणायचे, असा सवाल आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, जुना मोटार स्टँड परिसरात जो काही प्रकार झाला तो कशामुळे झाला हे सातारकरांना माहिती आहे. विषय दारू दुकानाचा नव्हता, विषय होता तो त्यांच्या बगलबच्च्यांची जागा खाली करून देण्याचा. जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना आणि जागा खाली करण्याबाबतचा कोणताही लेखी आदेश नसताना उदयनराजेंनी धाकदपटशाही, दहशत आणि दंडेलशाहीचा वापर करून रवी ढोणे यांचे दुकान पाडण्याचा प्रयत्न केला. हा पूर्णपणे नियोजनबद्ध प्लॅन होता; पण मी आणि पोलिस यांच्यामुळे उदयनराजेंचा प्लॅन उधळला गेला. तुमचे जागा बळकावण्याचे पितळ उघडे पडले म्हणून तुम्ही दारू दुकान, दारू दुकान म्हणून ओरडत आहात. एवढेच तत्त्वनिष्ठ असाल तर, रवी ढोणेचेच का? तुमच्या मतदारसंघातील सर्वच दारू दुकाने बंद करून दाखवावीत.

घर छोटे असो वा मोठे, घर प्रत्येकालाच प्रिय असते. माझ्या घरावर कोणी चाल करून येत असेल तर, मी शांत कसा बसेन. उदयनराजेंचा त्यावेळचाही प्लॅन फसला. उलट, त्यांच्याच अंगलट आला. माझ्यावर अन्याय होत असेल तर, मी जशास तसेच उत्तर देतो, हे उदयनराजेंना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे उदयनराजेंनी माझ्यावर होणार्‍या अन्यायाची चिंता करू नये, असेही आ. शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे.

जुना मोटार स्टँडवरील ते दुकान 1972 पासून आहे. ती जागा उदयनराजे यांचे निकटवर्तीय खुटाळे यांची आहे आणि ढोणे व खुटाळे यांचा वाद न्यायप्रविष्ट आहे. असे असताना, कोणताही न्यायालयीन आदेश नसताना पालिकेच्या सत्तेचा गैरवापर करून खुटाळे यांना जागा मोकळी करून देण्यासाठी उदयनराजेंनी नियोजनबद्ध प्लॅन केला होता. केवळ दारूच्या दुकानाची जागाच नाही. तर, तो संपूर्ण परिसर हा वाहनतळ म्हणून आरक्षित आहे. असे असताना उदयनराजेंसोबत खुटाळे आणि जागा बळकावल्यानंतर विकसित करणारे निष्का डेव्हलपर्स हा विकसक कशासाठी आला होता, असा सवालही त्यांनी विचारला.

खासदार असणार्‍या उदयनराजेंना दुकाने पाडणे आणि जागा खाली करून देणे यासारख्या सुपार्‍या घेण्याचेच काम आहे का? जर उदयनराजे तेथे गेले नसते तर मीही गेलो नसतो आणि तणावही झाला नसता. खुटाळे आणि ढोणे यांनी त्यांचा विषय त्यांनीच सोडवला असता. मग, उदयनराजेंना त्या ठिकाणी पालिकेची यंत्रणा घेऊन जाण्याचे कारण काय होते, असा सवाल आ. शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला आहे.

ढोणे यांचे दारूऐवजी पेढ्याचे अथवा दूध विक्रीचे दुकान असते तरी ते पाडायचे, अशीच भूमिका उदयनराजे यांची होती. त्यांना दारूचे दुकान पाडण्यात नाही तर, सर्व जागा बळकावायची होती, हे उघड झाले आहे. दारू दुकान अतिक्रमणात येत नाही. तर, ते खासगी जागेत आहे. तेथे तुमचा अथवा पालिकेचा काहीही संबंध नाही. तुमचे पितळ उघडे पडल्यानेच तुम्ही दारू दुकान, दारू दुकान असा बाऊ करत आहात.

No comments

Powered by Blogger.