बॉम्बे रेस्टॉरंटजवळ रस्त्यातच ‘रंकाळा’


खेड : सातारा - कोरेगाव रस्त्यावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावर खड्ड्यांचा सडा पडला आहे तर एमआयडीसीकडे जाणार्‍या मार्गावर सुमारे 3 ते 4 फुट खोलीच्या खड्ड्यात पाणी साचून तलाव निर्माण झाला आहे. येथील जीवघेण्या खड्डयांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत असून भीषण दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का? असा संतप्त सवाल वाहनधारकांमधून व्यक्त केला जात आहे.

सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. दळणवळणाचा मुख्य रस्ता असलेल्या या चौकातील सेवा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळेनासे झाले आहे. चौकातून एमआयडीसीकडे जाणार्‍या रस्त्यावर सुमारे 3 ते 4 फूट खोलीचा खड्डा पडला आहे.

 पावसाचे व नजिकच्या व्यापारी संकुलातील सांडपाणी साठून खड्ड्यााचा रंकाळा झाला आहे. त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली असून येथील खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकी धारक खड्ड्यात पडून जायबंदी झाले आहेत तर काहींना अपंगत्व आले आहे. येथील नजिकच्या व्यापारी संकुलातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने रस्त्यावरच सांडपाणी येवून परिसरात दलदल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

या रस्त्यावरुन वनवासवाडी, मानेनगर, देशमुख वस्ती व एमआयडीसीकडे जाणार्‍या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून एखाद्या वाहनधारकाकडून खड्ड्यातील पाणी रस्त्याने जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर उडते तर त्यातून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

येथील चौकातील खड्ड्यांची मालिका दिवसेेंदिवस अक्राळविक्राळ होत असून जीवघेण्या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना त्याचा फटका बसत आहे. पावसाचा जोर वाढल्यास या रस्त्यावरील खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने परिसरातील वाहतूक ठप्प होते. तर या ठिकाणी साईडपट्टया व पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार नसल्याने रस्त्यावरच पाण्याची डबकी तयार झाली आहेत.

रस्ते विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संदोपसुंदीत येथील खड्डा जीवघेणा ठरत असून खड्डे कोणी मुजवायचे यावर संबंधित विभागाचे एकमत होत नसल्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. तर नित्याची वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, अन त्यात पावसाचे पाणी अशा समस्यांच्या भस्मासूरातून मार्ग काढताना वाहनधारकांचे कंबरडे मोडले आहे.

No comments

Powered by Blogger.