कोयनेतील बोटिंग सुरू होण्याची चिन्हे


पाटण : राज्याचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी यांनी कोयना धरणातील बोटींग तातडीने सुरू करण्याचे आदेश दिल्याने पर्यटक व पर्यटन विकासाचा ध्यास घेतलेल्या लोकांना ‘दिवाळीची भेट’ मिळाली आहे. त्यामुळे आता धरणाच्या सुरक्षेचा बागुलबुवा करत साडेतीन वर्षापूर्वी बंद करण्यात आलेले बोटींग पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. कोयना धरण व परिसरात गेल्या काही वर्षांत पर्यटन विकास मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने कोयना हे पर्यटनासाठी रोल मॉडेल ठरत होते. यात शिवसागर जलाशयातील बोटींग, नेहरू गार्डन, पॅगोडा, पावसाळ्यातील ओझर्डेसह अन्य धबधबे यांचा समावेश होता. त्यामुळे येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटकांचा लोंढा येत होता. मात्र साडेतीन वर्षांपूर्वी अचानकपणे धरण सुरक्षेचा कांगावा करत वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या बोटींगला बंदी घालण्यात आली. त्यानंतर दुर्दैवाने स्थानिक पर्यटन विकासाचा यात बळी गेला.

गेल्या काही वर्षांत पुन्हा हे बोटींग पहिल्यासारखे सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न झाले. मंत्र्याचे दौरे, पाहणी अभियान व कागदी घोडी नाचविण्यात आली पण पदरात केवळ घोर निराशाच पडली. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटक यांच्या अपेक्षांवर पाणी पडले होते. वास्तविक कोयना पर्यटन विकासातील बोटींग हा मुख्य कणा मानला जातो. त्यामुळे त्याच्याशिवाय पर्यटनाला अपेक्षित चालनाच मिळू शकत नाही हे सिद्ध झाले आहे. बोटींग बंदीमुळे गेल्या साडेतीन वर्षांत येथे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याने पर्यटन व्यवसाय मोडीत निघत आहे.धबधब्यांमुळे पावसाळ्यातील काही मर्यादित दिवस वगळता अन्य काळात या बोटींग आकर्षणावरच येथे पर्यटक यायचे. मात्र साडेतीन वर्षात असे होताना दिसलेच नाही. त्यामुळेच आता पुन्हा एकदा बोटींग सुरू होणार असल्याने कोयनेतील पर्यटनाला ‘अच्छे दिन’ प्राप्‍त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी कोयना परिसराची पाहणी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख व कोयना सिंचन विभागाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी केला. या पाहाणीनंतर अहवाल वरिष्ठांकडे सादर होऊन त्याबाबतची पुढील कार्यवाही होणार आहे. आजवर अनेकदा पाहाणी दौरे झाले, मात्र पुढे काहीच कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळेच आता या पाहणी दौर्‍याचे काय होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments

Powered by Blogger.