आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

नोंद केलेला संपूर्ण ऊस शरयुस गळीतास द्यावा : श्रीनिवास पवार


स्थैर्य, फलटण : शरयू कारखान्याने ठेवलेल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी परिसरातील ऊस उत्पादकांनी नोंद केलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन चेअरमन श्रीनिवास पवार तथा बाप्पूसाहेब यांनी शरयु अॅग्रो इंडस्ट्रीज लि. या कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ. शर्मिला वहिणीसाहेब पवार यांचे शुभहस्ते व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा.श्री.अमरसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

२०१८-१९ या गळीत हंगामासाठी सातारा, पुणे सोलापूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १९ हजार हेक्टर उस क्षेत्राची नोंद झालेली असून गळीतासाठी १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मागील गळीत हंगामात गळीतास आलेल्या ८ लाख मे. टन ऊसाला केंद्र सरकारच्या नियमानुसार एफ. आर. पी. पेक्षा अधिक रक्कम वेळेत अदा केली आहे. तसेच ज्या ऊस उत्पादक पुरवठा दारांना प्रति मे टन रु २३५० प्रमाणे रक्कम यापूर्वी अदा केली आहे त्या शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी आणखी १५० रु प्रति मे टनाप्रमाणे रक्कम अदा केली जाणार असून उर्वरित देय रक्कम निधी उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. कारखान्यात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांना दिवाळी साठी ८.३३% बोनस देण्यात येणार आहे.

शरयुने अद्यावत तंत्रज्ञान स्विकारत ६० के एल पी डी क्षमतेची आसवनी प्रकल्पाची उभारणी पूर्ण केली असून सध्या त्यातून इथेनॉल व स्पिरीटचे उत्पादन घेतले जात आहे. कारखान्याचा ३० मे वॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित असून या हंगामात जास्तीत जास्त वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊस तोडणी वाहतुकीसाठी सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणेबरोबर करार पूर्ण झाले आहेत

ज्या ऊस उत्पादकांनी मागील गळीत हंगामात ऊस पुरवठा केला आहे त्या शेतकऱ्यांना दिवाळी सणासाठी मोफत साखर पोहोच केली जाणार आहे. कारखान्याने ठेवलेल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी परिसरातील ऊस उत्पादकांनी नोंद केलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास दयावा असे आवाहन चेअरमन श्री श्रीनिवास पवार तथा बाप्पूसाहेब यांनी केले आहे

या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे संचालक श्री अविनाश भापकर, वरिष्ठ अधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, शरयु फौंडेशनचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.