माढ्यासाठी प्रभाकर देशमुख इच्छुक


दहिवडी : मुंबईत रविवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत सातारा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवाराबाबत रणकंदन झाले. याच बैठकीत माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी आपण माढा लोकसभा मतदार संघातून इच्छुक असल्याचे खा. शरद पवार यांना सांगितले असल्याची माहिती पत्रकारांना दिली. प्रभाकर देशमुख हे माजी सनदी अधिकारी असून त्यांनी राज्यात जलसंधारणाला नवी दिशा दिली. माण तालुक्यातील लोधवडे या त्यांच्या गावी त्यांनी स्वत: 15 वर्षांपूर्वीच जलसंधारणाची लोकचळवळ राबवून जलयुक्त शिवार अभियान राबवले. त्या माध्यमातून तो संदेश राज्यभर दिल्यानंतर सेना भाजपा सरकारने जलयुक्त शिवार अभियान राज्यभर राबवले.

प्रभाकर देशमुख यांचे प्रशासनातील कार्य समाजाला दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या कामावर प्रभावित होवून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही त्यांचे निकटवर्तीय झाले. शरद पवार यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळे देशमुख यांनी निवृत्तीनंतर माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काम सुरु केले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत अनेक मेळावे त्यांनी घेतले. ते लोकसभेसाठी इच्छुक आहेत की विधानसभेला? याबाबत जनतेमध्ये तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसभवन येथे झालेल्या बैठकीत दस्तुरखुद्द शरद पवार यांच्यासमोर माढा मतदार संघातून लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी जाहीर केले.

माढा लोकसभा मतदार संघासाठी प्रभाकर देशमुख इच्छुक असल्याचे समजताच माणमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला व माणलाच उमेदवारी देवून प्रभाकर देशमुख यांच्यासारखा सक्षम नेता लोकसभेत पाठवावा, अशी मागणी केली.

No comments

Powered by Blogger.