पवारांनी संधी दिल्यास सोनं करेन


सातारा : गत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपण सत्ताधारी भाजप पक्षातून इच्छुक होतो. पण त्यावेळी मित्रपक्षाने षड्यंत्र केले आणि अपक्ष लढावे लागले. त्यावेळी आरपीआयला संधी देण्यात आली. जनतेच्या प्रेमापोटी लढलो आणि अडीच लाख मते त्यावेळी मिळाली. उदयनराजे हे माझे आजही मित्र आहेत आणि पुढे राहणार आहेत. पण, पक्षाने आदेश दिले तर त्यांच्याविरोधात राजकीय आखाड्यात उतरणार असल्याची स्पष्टोक्ती भाजपचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. 

दरम्यान, शरद पवार यांनी संधी दिली तर त्याचेही सोने करेन, असे वक्तव्य करुन त्यांनी खळबळही उडवून दिली. जाधव पुढे म्हणाले, मी भारतीय जनता पार्टीचे काम प्रामाणिकपणे करत आहे. गत निवडणुकीत जनतेकडून मला उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी मोदी लाट होती त्यात मी निवडून आलो असतो. पण आमच्याच मित्रपक्षातील लोकांनी षडयंत्र रचल्याने सातारा लोकसभा आरपीआयला सोडावी लागली. मात्र, लोकांच्या प्रेमाखातर मी अपक्ष लढलो आणि त्यावेळी अडीच लाख मते मिळाली. मात्र, आगामी निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागणार असून पक्ष लोकसभेसाठी उमेदवारी देईल याची खात्री आहे. यावेळी मला माझे नशीब साथ देईल यात शंका नाही.

राष्ट्रवादीच्या गोटात खा. उदयनराजे यांना त्यांच्याच पक्षातील काही आमदार विरोध करत आहेत. त्यामुळे शरद पवार नक्की कोणाला उमेदवारी देणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. शरद पवार यांनी जर मला संधी दिली तर त्याचेही सोने करेन अन सातार्‍याचा विकास करेन. सातारकरांच्या प्रेमासाठी वाटेल ती लढाई लढण्यास मी तयार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.‘झी’ मराठीवरील महाराष्ट्र कुस्ती दंगल या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या यशवंत सातारा या संघाची मालकी पुरुषोत्तम जाधव यांनी विकत घेतली आहे. सातार्‍याला कुस्तीची मोठी परंपरा लाभली असल्याने ही परंपरा पुढे चालू रहावी, यासाठी मी संघाची मालकी विकत घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेत सहा संघ असून 12 स्पर्धकांची टीम असणार आहे. पुणे येथील बालेवाडी येथे दि. 2 ते 18 नोव्हेंबरदरम्यान या स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी सातारकरांच्या प्रेमापोटी राजकीय आखाड्यात उतरत आहे. मला राजकारणापेक्षा सातारा जिल्ह्याचा विकास आणि नावलौकिक महत्वाचा आहे. त्यामुळे तर मी यशवंत सातारा या कुस्ती टीमची मालकी घेतली आहे. मला आखाड्यातील कुस्त्या खेळण्यापेक्षा राजकीय कुस्त्या लावण्यात इंटरेस्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments

Powered by Blogger.