मराठा आरक्षण देणार: चंद्रकांत पाटील


कराड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी प्राणाची आहुती दिल्यानंतर १९८२ नंतर मराठा आरक्षणाची चळवळ काही प्रमाणात शिथिल झाली होती. त्यानंतरच्या राज्य शासनांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ असे म्हणत झुलवतच ठेवले होते. जवळपास दहा वर्ष राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात आला नव्हता. मात्र आम्ही सत्तेवर येताच या आयोगाची स्थापना केली असे स्पष्ट करत राज्य शासन मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

कराड (जि. सातारा) येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींच्या वसतीगृहाचे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार आनंदराव पाटील, आमदार मोहनराव कदम, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष नामदार शेखर चारेगावकर, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार अतुल भोसले, सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपा नेते मनोज घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी २०१४ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सरकारने आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला होता. मात्र काँग्रेस सरकारने स्थापन केलेली तत्कालीन मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही आयोग नव्हती, ही एक समिती होती असे मत न्यायालयात नोंदवले आहे. त्यामुळे हा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही. त्याचबरोबर २०१४ नंतर युती शासन सत्तेत आले आणि आम्हीही त्याबाबतचा कायदा केला.

No comments

Powered by Blogger.