जीवघेणी वळणे... प्रवाशांच्या जीवाचे खेळणे


पाटण : कराड-चिपळूण राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्याच्या कामात येथे वाहनधारकांना कवडीचीही किंमत नसल्याचे स्पष्ट पहायला मिळत आहे. भरमसाठ वाहनांचे कर भरूनही येथे प्रवाशी असो किंवा वाहन धारक यांना आपणच आपली सुरक्षा बाळगण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. हा रस्ता शासकीय मालमत्ता की खासगी कंपन्यांची मक्तेदारी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर काही किलोमीटर अंतरावर हजारो जीवघेणी वळणे व त्यांची कोणत्याही प्रकारे खबरदारी घेतली जात नसल्याने येथे हीच वळणे अपघाताची प्रमुख कारणे व आमंत्रणे ठरत आहे.

हा राष्ट्रीय महामार्ग बनविण्याच्या कामात गेल्या काही महिन्यांपासून काहींचे बळी तर छोट्या मोठ्या अपघातात अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. मात्र आजवर याची शासन असो किंवा प्रशासन ते थेट संबंधित ठेकेदार कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. वास्तविक या अपघात अथवा बळी, जायबंदी साठी हे व्यवस्थापनच जबाबदार असल्याचे या ढिसाळ खबरदारी वरून स्पष्ट होत असले तरी या संदर्भात कराड अथवा पाटण तालुक्यातील सत्ताधारी असो किंवा विरोधक नेते अथवा अन्य कोणीही सार्वजनिक आवाज उठविण्याचे धाडस दाखविले नाही. केवळ तोंडी चर्चा, तक्रारी करण्यातच ही मंडळी धन्यता मानतात ही वस्तुस्थिती आहे.

या रस्त्यावर अशा अवघड वळणे, अरूंद व निसरड्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात अनेक अपघात घडले. आता पावसाचा हंगाम संपल्याने पुन्हा कामासाठी जोर लावला जात असताना वाहनधारकांना प्राधान्यक्रम देण्याऐवजी संबंधित कंपन्यांची कामे, वाहने यांना अग्रक्रम देण्यात येत असल्याने मग वाहनाधारकांना अशा मनमानी व मुजोर व्यवस्थापनाचा सामना करावा लागत आहे. अगदी चोर अथवा भिकार्‍यांप्रमाणे मिळेल तेवढ्या रस्त्याने तेही थांब म्हटले की थांबायचे आणि जा म्हणल्याशिवाय जायचे नाही अशी दयनीय अवस्था होवून बसली आहे. निश्‍चितच प्रवाशी व वाहनधारकांच्या सुरक्षेचा खेळखंडोबा केलेल्या या मनमानी कारभारामुळे सगळेच त्रस्त झाले असून शासन, प्रशासन व नेतेमंडळी नक्की कशात व्यस्त की मस्त आहे ? असाच सामाजिक प्रश्‍न निर्माण झाला आहे.

या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत अशा ठिकाणी चारचाकी वाहनांच्या उंचीपेक्षाही भलेमोठ्या या गतीरोधकांजवळ वाहन गेल्यावर समोरून येणारे वाहनच दिसत नसल्याने अनेकदा अपघात घडतात. तर मुळातच या रस्त्यावर हजारो खड्डे व झालेली चाळण पहाता येथे वाहनांना वेग वाढवताच येत नाही त्यामुळे मग असे गतिरोधक विनाकारण अपघातांचे मुळ ठरत आहेत.

No comments

Powered by Blogger.