खटावच्या दुष्काळाकडे दुर्लक्ष का? : एकनाथ शिंदे


सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांतील 40 हून अधिक गावांमध्ये प्रचंड पाणीटंचाई असल्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी टँकरची संख्या वाढवा. दुष्काळी भागात धरणांतून पाणी सोडा. खटावमध्ये दुष्काळग्रस्तांनी केलेल्या आंदोलनाची प्रशासनाने का दखल घेतली नाही? दुष्काळग्रस्तांच्या तीव्र भावनांचा विचार करा, अशा परखड शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सुचना केल्या.ना. एकनाथ शिंदे जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाशी चर्चा केली. 

बैठकीस जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, आ. शंभूराज देसाई, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारकवर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, रोहयो उपजिल्हाधिकारी संजय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, दादासाहेब गायकवाड, जयश्री आव्हाड आदि अधिकारी उपस्थित होते. ना. एकनाथ शिंदे यांनी आ. शंभूराज देसाई यांच्याकडून जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्याची माहिती घेवून दुष्काळासंदर्भात प्रथम चर्चा केली.

त्यानंतर सुरु झालेल्या बैठकीत ना. एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. खटाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी तालुक्यांच्या यादीत या तालुक्याचा समावेश व्हावा, या मागणीसाठी दुष्काळग्रस्तांनी केलेल्या आंदोलनाची दखल प्रशासनाने का घेतली नाही? दुष्काळग्रस्तांच्या भावनांचा विचार करायला हवा. दौर्‍यात दुष्काळग्रस्तांनी तीव्र भावना व्यक्‍त केल्या आहेत. टँकरची मागणी होत असताना प्रस्ताव मंजूर का केले जात नाहीत? दुष्काळग्रस्तांना आवश्यकतेनुसार ताबडतोब टँकर वाढवा. चिलेवाडी (ता. कोरेगाव) येथे टँकरने दुषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची सुचना केली. यावेळी आ. शंभूराज देसाई यांनी जनावरांच्या चार्‍यांचे काय नियोजन केले, अशी विचारणा केली.

ना. एकनाथ शिंदे म्हणाले, जिल्ह्यात चार्‍याची टंचाई निर्माण होणार असल्याने त्यासाठी कार्यक्रम आखा. दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या डाळिंबीच्या बागा जगल्या पाहिजेत. पांगरी, बिजवडी परिसरातील विहिरींच्या पाणीपातळी अत्यंत घट आली आहे. दुष्काळग्रस्त किंवा त्या भागातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्या विचारात घेवून त्यावर तातडीने कार्यवाही झाली पाहिजे. खटाव तालुक्याचा अहवाल सादर करा. दुष्काळी तालुका म्हणून त्याची अंमलबजाणी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. जिहे-कठापूर, धोम-बलकवडी, वसना-वांगणा, उरमोडी धरणातून दुष्काळी भागास पाणी सोडण्याचे आदेशही ना. शिंदे यांनी दिले. श्‍वेता सिंघल म्हणाल्या, ट्रिगर 1, 2, 3 च्या निकषात खटाव तालुका पात्र ठरला नाही. मात्र, त्याचा अहवाल प्रशासनाने राज्य शासनाला सादर केला आहे. नुकसानीची माहितीही कळवण्यात आली आहे.

दुष्काळाचे सावट गडद होत असताना पाण्याबरोबरच चार्‍याच्या टंचाईचाही सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील जनावरांना आठ दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याचे मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सांगितले. चार्‍याच्या उपलब्धतेसाठी कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

No comments

Powered by Blogger.