महाळ जेवण्यासाठी दररोजच होतोय आग्रह


सातारा : विघ्नहर्त्या बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर सुरू झाली ती महालय प्रतिपदा. पितृ पक्षाची सुरुवात होवून आता आठवडा होत आला पुढील आणखी आठ दिवस तरी पितृ पंधरवडा आहे. त्यामुळे दररोज कुठे ना कुठे जेवणाचा आग्रह सुरू आहे. दरम्यान, पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्यांचे दरही कमालीचे भडकले आहेत. पितृ पंधरवड्यामध्ये आपण पितरांची आठवण करतो. भारतीय संस्कृतीत पितृपक्षाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आजवर या पितृपक्षाला अशुभ मानले जात होते. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ या काळात करू नये, असा समज रुढ होता. परंतु बदलत्या काळासोबत ही संकल्पना आता बदलते आहे. 

त्यामुळे मोठी खरेदी अथवा व्यवहार किंवा शुभकार्येही आता या काळात पार पाडली जाऊ लागली आहेत. पितृपक्षाचा संबंध यमाशी तसेच मृत्यू पावलेल्या पूर्वजांशी असल्यामुळे तो अशुभ समजला जात असे, परंतु धर्मशास्त्राने मात्र असे सांगितले आहे की, उलट किमान तीन पिढ्यांचे पूर्वज त्यांच्या सध्याच्या पिढ्यांच्या निवासस्थानी स्वर्गलोकात जाण्यापूर्वी आत्मारुपाने येत असतात. त्यांची प्रगती पाहून समाधानी होत असतात. त्यांना सुख, समृद्धी आणि शांतीचा आशीर्वाद देत असतात. अशा काळाला अत्यंत शुभ मानले पाहिजे. बदलत्या काळानुसार आता पितृ पंधरवड्यातही यामुळे विविध कार्यक्रम होत असतात. अनेक ठिकाणी या महाळाचे जेवण करण्यासाठी आग्रहही होत असतो. विशेषत: ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे.

दरम्यान, पितृ पंधरवड्यामुळे सर्वच पालेभाज्या महागल्या असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे. भाज्यांचे दर जवळपास दुप्पटीने वाढले आहेत.

पितृपक्ष म्हणजे काय?

अश्‍विन मासाच्या संपूर्ण कृष्ण पक्षांमध्ये पितरांना शांत करण्यासाठी त्यांची पितृ पक्षात आठवण केली जाते. यालाच पितृपक्ष असे म्हटले जाते. या पक्षामध्ये ज्ञात- अज्ञात सर्वच पितरांना दान केले जाते. पूर्वजांची एक आठवण केली जाते, अशी धार्मिक प्रथा आहे. विष्णू पुराणामध्ये असे सांगितले जाते की, पितरांना पिंड दान केल्याने श्राद्ध करणार्‍यांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या जातात.

No comments

Powered by Blogger.