आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

स्वाभिमानीचे आंदोलन स्थगित


फलटण : न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी ता. फलटण या कारखान्याकडे गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट सुमारे 51 कोटी आणि कामगारांचे पगार 8 कोटी त्वरित मिळावेत. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुरु असलेले ठिय्या आंदोलन 27 दिवसानंतर पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांच्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले. मात्र, न्यायालयात या बाबत लढा सुरूच ठेवणार असल्याचे धनंजय महामुलकर यांनी सांगितले आहे.

न्यू फलटण शुगर वर्क्स लि., साखरवाडी या कारखान्याकडे गतवर्षीच्या गाळपाचे 51 कोटीचे ऊस पेमेंट आणि कामगारांचे पगार 8 कोटी रुपये येणे असल्याने त्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेले 27 दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. त्याचप्रमाणे आतापर्यंत अनेक बैठका, सभा, मोर्चे, आंदोलने, साखर आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात जावून निवेदनाद्वारे लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली मात्र कोणीही समाधानकारक निर्णय न घेतल्याने हे ठिय्या आंदोलन सुरु होते.

सोमवारी ना. विजय शिवतारे हे फलटणमध्ये दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून साखर आयुक्त, सहकार आयुक्त व सहकार मंत्र्यांशी चर्चा करुन यातून काय मार्ग काढता येईल. यासाठी निश्‍चित प्रयत्न करु. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता किंवा कसल्याही दबावाला बळी न पडता या प्रश्‍नात शेतकर्‍यांची बाजू घेवून प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न राहील, असे आश्‍वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.