शेतीसाठी मिळणार दिवसा वीज


सणबूर : पश्‍चिम महाराष्ट्रात वीज गळतीचे तसेच थकबाकीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साडेसहा लाख शेतकर्‍यांना मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेतून दिवसा वीज पुरवठा केला जाणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.मरळी (ता. पाटण, जि. सातारा) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत ना. बावनकुळे यांनी ही माहिती दिली. आ. शंभूराज देसाई यांची यावेळी उपस्थिती होती.

ना. बावनकुळे म्हणाले, 44 लाख शेतकर्‍यांपैकी 22 लाख शेतकर्‍यांना रात्री वीज पुरवठा केला जातो. येत्या पाच वर्षांत राज्यात शेतकर्‍यांना मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेंतर्गत विद्युत पुरवठा केला जाणार आहे. या विजेचा दर सहा रुपयांऐवजी 2 रुपये 60 पैसे इतका असेल. त्याचबरोबर महावितरण कंपनीला देखभाल, दुरुस्तीसाठी निधीची गरज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी किमान 30 टक्के बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहनही ना. बावनकुळे यांनी केले.

काँग्रेसच्या काळात 5 लाख 18 हजार शेतकर्‍यांना कनेक्शन मिळाले नव्हते. आम्ही कोणताही भेदभाव न करता 2 लाख 28 हजार शेतकर्‍यांना मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेतून येत्या आठवडाभरात कनेक्शन देणार आहोत. त्याचबरोबर एक शेतकरी, एक ट्रान्स्फॉर्मर ही योजनाही सुरू करण्यात आल्याचे ना. बावनकुळे यांनी सांगितले.

कोयना धरणाला भेट देऊन कोयनेच्या 80 मेगावॅटच्या प्रकल्पाच्या बंद पडलेल्या कामासाठी वरिष्ठ पातळीवर बैठकही घेतली जाणार आहे. त्याचबरोबर आमदार शंभूराज देसाई यांनी डोंगरी विकास योजनेसाठी मागणी केलेल्या पाटण मतदार संघातील 11 कोटी 83 लाख रुपयांच्या विकासकामांना राज्याच्या हरित ऊर्जा प्रकल्पातून तातडीने मंजुरी दिली आहे. त्याचा धनादेश येत्या चोवीस तासांत बांधकाम खात्याकडे वर्ग केला जाईल, असेही ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.