पवारांनी चेंडू टाकला कार्यकर्त्यांच्या कोर्टात


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण असावा, याची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील सुमारे 100 हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मुंबईत राष्ट्रवादी भवनात उद्या (रविवारी) बोलावले आहे. उमेदवारीचा चेंडू नेत्यांऐवजी कार्यकर्त्यांच्या कोर्टात टाकून पवारांनी ग्राऊंडवरील कार्यकर्त्याला ताकद दिली आहे.सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले आहेत, तर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आहेत. 

दोन्ही मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बराच खल सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना उमेदवारीसाठी स्थानिक आमदार व इथल्या नेतेमंडळींशी सामना करावा लागत आहे. शरद पवार यांच्या सातारा जिल्ह्यात झालेल्या दौर्‍यावेळी दोन्ही गटांनी शक्तिप्रदर्शन करून दाखवले आहे. आमदारांच्या एका गटाने उदयनराजेंसंदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर शरद पवारांनी दोन्ही गटांशी चर्चा केली. सर्वांना एकत्रित बसवून निर्णय घेऊ, असे पवारांनी त्याचवेळी सांगितले होते. 

शरद पवारांचा कल उदयनराजेंच्या बाजूने आहे. आमदारांची समजूत काढून त्यांना उदयनराजेंच्या प्रचारासाठी कामाला लावायचे पवारांच्या डोक्यात दिसते आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे समेटाचे प्रयत्न सुरु आहेत. ग्राऊंडचा अदमास घेण्यासाठी पवारांनी आमदार व पदाधिकार्‍यांशी चर्चाही केली आहे. त्यापुढे एक पाऊल टाकत आता उद्या (रविवारी) दुपारी 1 वाजता सातारा जिल्ह्यातुील सुमारे 100 हून अधिक कार्यकर्त्यांना त्यांनी मुंबईत राष्ट्रवादी भवनात बोलावले आहे. ग्राऊंडवर काम करणार्‍या कार्यकर्त्यांकडून पवारांना वस्तूस्थितीचा अंदाज घ्यायचा असल्याने तसे निरोप गेले आहेत. 

या बैठकीला खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे पदाधिकारी व संघटनात्मक काम करणारे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याने ही बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत. बैठकीत कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना थेट व स्पष्ट मते मांडण्याचे स्वातंत्र्य दिले गेले असल्याने बैठक रंगतदार होणार आहे.

माढा लोकसभा मतदार संघात सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, उत्तर कोरेगाव व फलटण हे तालुके येत असल्याने या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्तेही बैठकीला जाणार आहेत. सातार्‍यापूर्वी माढ्याची बैठक होणार असल्याने त्याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी दि. 7 ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक लावली असली, तरी या बैठकीला आ. शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहणार नाहीत. शिवेंद्रराजे एव्हरेस्टच्या मोहिमेवर असल्याने ते बैठकीला नसतील. खा. उदयनराजे यांना सध्या टोकाचा विरोध आ. शिवेंद्रराजे हेच करत आहेत. मात्र, तेच बैठकीला नसल्याने इतर आमदार काय बोलणार, याविषयी उत्सुकता आहे.

No comments

Powered by Blogger.