आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

राजधानीत आज भवानी तलवारीची मिरवणूक


सातारा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या दसर्‍याच्या सणासाठी ऐतिहासिक शाहूनगरी सज्ज झाली आहे. गुरुवारी सीमोल्लंघनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13 वे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत धार्मिक विधी पार पडल्यावर राजधानी सातार्‍यात ऐतिहासिक श्री भवानी तलवारीची मिरवणूक निघणार आहे. दसर्‍याच्या या शाही मिरवणुकीकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे. विजयादशमीनिमित्त सातारा शहरात प्रतिवर्षी होणारे सीमोल्लंघन आणि शस्त्रपूजन सोहळा गुरुवारी (दि. 18) सायंकाळी 5 वा. जलमंदिर पॅलेस, सातारा येथे होणार असून खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते व राजमाता श्री.छ. कल्पनाराजे भोसले, श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांच्या उपस्थितीत भवानी तलवारीचे पूजन करण्यात येणार आहे. 

विधीवत धार्मिक विधी पार पडल्यावर पालखीमधून श्री भवानी तलवारीची मिरवणूक जलमंदिर पॅलेस येथून निघणार आहे. मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही मिरवणूक जलमंदिर येथून परंपरेनुसार राजवाडा-मोतीचौक-देवी चौक-कमानी हौद- शेटे चौक- खालच्या रस्त्याने पोवईनाक्यावर येणार आहे. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तेथे उभारण्यात येणार्‍या पूजा मंडपामध्ये खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्याठिकाणी सीमोल्लंघन केल्यावर पुन्हा त्याच मार्गावरुन भवानी तलवारीची मिरवणूक जलमंदिर येथे पोहचेल. जलमंदिर येथे विधिवत पूजन झाल्यावर खा. उदयनराजे भोसले आणि राजघराण्यातील मान्यवर व्यक्ती, सोनेरुपी आपटयांच्या पानाचा जलमंदिर पॅलेस येथील श्री तुळजाभवानी मंदिरात स्वीकार करतील. हा सोहळा अधिक दैदिप्यमान होण्यासाठी आणि एक लोकमहोत्सव ठरण्यासाठी सातारकर नागरिकांनी बहुसंख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.