Your Own Digital Platform

संस्था न काढणार्‍यांनी मला शिकवू नये


फलटण : श्रीराम साखर कारखाना पुढील वर्षी संपूर्ण कर्जमुक्त होईल. त्यावेळी हा कारखाना सभासदांना सर्वात जादा दर देणारा कारखाना म्हणून जिल्ह्यातील अग्रेसर होईल. त्यामुळे ज्यांनी एक संस्था काढली नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला विधानपरिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खा. उदयनराजे भोसले व आ.जयकुमार गोरे यांना लगावला. श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 13 व्या गळीत हंगाम प्रारंभी बोलत होते. यावेळी दादाराजे खर्डेकर, आ. दीपक चव्हाण पं. समितीच्या सभापती सौ.प्रतिभा धुमाळ, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर,सौ. रेश्मा भोसले व मान्यवर उपस्थित होते.

ना. रामराजे म्हणाले, श्रीराम सहकारी साखर कारखाना आर्थिक गर्तेत सापडला असताना स्व. विलासराव देशमुख यांच्या सल्ल्यानुसार कलप्पान्‍ना आवाडे यांना हा कारखाना चालवायला दिला होता. त्यामुळेच हा कारखाना आज 3300 ते 3400 मेट्रीक टन दररोज गाळप करत आहे. कारखान्याच्या माध्यमातून इथेनॉल प्रोजेक्ट राबवायला सुरूवात केली आहे. बरड येथील कारखान्याच्या अडचणी दूर झाल्या असून हाही कारखाना लवकरच सुरू होईल.

यंदा उसाचे क्षेत्र जास्त असल्याने योग्य नियोजन करा. न्यू शुगर पुन्हा सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. हा कारखानाही कोणत्याही परिस्थिती सुरू होईल. श्रीराम व शरयूलाही सर्व ऊस गाळप होईल याची खबरदारी घ्या.

आम्ही कोणत्याही क्षेत्रात राजकारण करत नाही. नाहीतर उठ सूट राजकारण करणारे या जिल्ह्यातील गावागावात आहेत. आम्ही आमच्या आजोबांनी उभारलेल्या या कारखान्यात रघुनाथराजे व संजीवराजे यांनी कारखाना वाचवण्यासाठी केल्यानेच श्रीराम कारखाना कर्ज मुक्त तर होतोआहे. पण तालुक्यातील एक नंबरचा दर देणारा तसेच एफ आर पी पेक्षा 400 रुपये जादा देणारा असून जिल्ह्यातील चांगला दर देणारा व वेळेत शेतकर्‍यांना पैसे देणारा कारखाना म्हणून गणला जात आहे.

यावेळी दादाराजे खर्डेकर, डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रस्ताविक संतोष खटके यांनी केले. आभार कांतीलाल बेलदार यांनी मानले. यावेळी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.