आण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घ्यावा : नरेंद्र पाटील


ढेबेवाडी : राज्यातील होतकरू तरूणांना बिनव्याजी कर्ज मिळवून दिले जात आहे. उद्योजक बनण्यासाठी त्यांना सहाय्य करून कर्जे देणार्‍या बँकांना व्याजाची हमी देणारे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे देशातले पहिले महामंडळ आहे. त्यामुळे मराठा समाजासह युवक - युवतींनी कर्ज योजनांचा लाभ घेत उद्योजक बनावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून ढेबेवाडी येथे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. पाटणच्या सभापती उज्ज्वला जाधव, माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, पंचायत समिती सदस्य प्रतापराव देसाई, भाजपा महिला मोर्चाच्या कविता कचरे, भाजपाचे दीपक महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. नरेंद्र पाटील म्हणाले, कर्जे परतफेड करण्याची मानसिकता कमी झाल्याने बँका अडचणीत येतात. त्यामुळे बँका कर्जे देण्यास नाखूष असतात. मात्र या महामंडळाकडून तसे घडू नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे. बँकांच्या व्याजाची हमी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. त्यामुळे बँका परिपूर्ण प्रकरणाला कर्जे नाकारु शकणार नाहीत. जनतेने राजकारण बाजूला ठेवून महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा व स्वत:ची प्रगती साधावी.

गट - तट, पक्ष न पाहता हे महामंडळ काम करेल. अण्णाभाऊ साठे महामंडळाची काही जणांनी अक्षरशः वाट लावली. मात्र हे महामंडळ मराठा समाजाच्या तरूणांना व उद्योजक बनू इच्छिणार्‍या महिलांसह बचत गटांना सक्षम करण्यासाठी काम करणार आहे. त्यांना मिळालेल्या कर्जाचे व्याज महाराष्ट्र शासन भरणार आहे. कर्जे घेणार्‍या उद्योजकांनी कर्जाचे हप्ते मात्र वेळेत भरणे गरजेचे आहे, असेही ना. नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

माथाडी कामगार संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख पोपटराव देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. तर प्राना फौंडेशनच्या डॉ. प्राची पाटील यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.