Your Own Digital Platform

सातारा बसस्थानक झालाय ‘उकिरडा’


सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा बसस्थानकात कचर्‍याचे ढिगच्या ढीग निर्माण झाले असून बसस्थानकाला उकीरड्याचे स्वरूप आले आहे. जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छतेबाबत डंका पिटला जात आहे. मात्र सातारा बसस्थानकात कचर्‍यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे. 

अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळेच बसस्थानकाला अवकळा आल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.पुणे-बंगलोर महामार्गावर मध्यवर्ती बसस्थानक म्हणून सातारा बसस्थानकाकडे पाहिले जाते. या बसस्थानकात राज्यातील विविध आगारासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व गोवा राज्याच्या विविध एसटी बसेस ये -जा करत असतात. त्यामुळे या बसस्थानकांवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. तसेच महामंडळाला जादा महसूल मिळवून देणारे बसस्थानक म्हणून सातारा बसस्थानकाचा राज्यात नावलौकिक आहे. मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे या बसस्थानकाची पुरती वाट लागली आहे.

गेल्या 15 दिवसांपासून केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनतर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम जिल्ह्यात सर्वत्र राबवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते,चौक स्वच्छ झाले. सातारा बसस्थानक मात्र याला अपवाद ठरले. महामंडळाच्या सातारा विभागासह सर्व आगारात स्वच्छता मोहिमेसंदर्भात जनजागृती झाली नाही की काय? असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होत आहे. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी कचर्‍याचे मोठमोठे ढिग निर्माण झाले आहेत.

 त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे. प्रवाशांना एसटी बसची वाट नाकाला रूमाल लावून पाहवी लागत आहे. तसेच पावसामुळे कचरा कुजला असल्याने डासांचे प्रमाणही या परिसरात वाढले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. महामंडळाच्या अधिकार्‍यांना सातारा बसस्थानकाची स्वच्छता करण्यासाठी कधी डोेळे उघडणार? कचर्‍यामुळे रोगराई निर्माण होवून साथीचे आजार फैलावल्यानंतरच अधिकारी स्वच्छता मोहीम राबवणार का? असा प्रश्‍न प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.

बसस्थानकाच्या स्वच्छतेचा ठेका दिला असला तरी ही स्वच्छता वेळच्या वेळी होते का नाही? याची अधिकार्‍यांनी शहनिशा करणे गरजेचे आहे. परिसरात सर्वत्र अस्ताव्यस्त कागद, खाद्यपदार्थाच्या पिशव्या पडल्या आहेत. तसेच स्वच्छतागृहामधूनही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी केलेल्या आसनव्यवस्थेचीही साफसफाई केली जात नाही अनेक ठिकाणी गुटखा व पानाच्या पिचकार्‍या मारल्या जात असल्याने प्रवाशांना बसताही येत नाही.

याबाबत प्रदुषण मंडळाने सांडपाण्यावर अधारीत प्रकल्प बसवण्याबाबत लेखी पत्रव्यवहारही करण्यात आला होता मात्र महामंडळाने यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.त्यामुळे महामंडळाचा सावळागोंधळ दिवसेंदिवस चव्हाट्यावर येवू लागला आहे.

सातारा बसस्थानकात दररोज हजारो बसेस ये जा करत असल्याने प्रवाशांची संख्याही बसस्थानकावर मोठी असते. त्यामुळे प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक पिशव्या सर्वत्र पडत असतात. त्यामुळे बसस्थानकात प्लास्टिकला बंदी घालणे गरजेचे आहे. जो कोण कचरा टाकत आहे त्यांच्यासह गुटखा, तंबाखू, पान खावून भिंतीवर पिचकार्‍या मारणार्‍यावर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच कचर्‍यावर उपाययोजनांची गरज आहे.