मसूरमध्ये ३ एटीएम फोडली


मसूर : एकाच रात्रीत भरवस्तीतील तीन एटीएम फोडल्याची घटना मंगळवारी (दि. 2) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम चालू असल्याने नेमकी किती रक्कम चोरट्यांनी चोरून नेली, याचा तपशील रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही. या घटनेने मसूर परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मसूरमध्ये एकूण चार एटीएम सेंटर आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र बँक, आयडीबीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि कराड अर्बन बँक या बँकांचे एटीएम सेंटर्स आहेत. तर अर्बन बँकेच्या शाखेजवळच अर्बन बँकेचे एटीएम सेंटर आहे. या ठिकाणी नेहमी पहारा देण्यासाठी एक सुरक्षारक्षक असतो.

तर इतर दोन बँकांची एटीएम ही बँकेपासून काही अंतरावर आहेत. तर अ‍ॅक्सिस बँकेची शाखा मसूरमध्ये नाही परंतु त्यांचे एटीएम सेंटर आहे. मसूर - उंब्रज रस्त्यावर युवराज पाटील चौकानजीक महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. याच रस्त्यावर स्टॅन्ड चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. तर कराड मसूर रस्त्यावर अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे.

मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तिन्ही ठिकाणची एटीएम फोडली. प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरेही चोरट्यांनी फोडले आहेत. लोखंडी वस्तूने प्रहार करून एटीएम मशीन फोडण्यात आलेली आहेत. परंतु चोरट्यांना एटीएम मशीन मधील रक्कम काढता आली नाही.

चोरट्यांनी प्रत्येक एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत. मशीन्सचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि चंद्रकांत माळी यांनी प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन कर्मचार्‍यांना तपासकामी सूचना दिल्या.

वर्दळीच्या ठिकाणी सदरची चोरी झाल्याने मोठे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आयडीबीआय बँकेच्या एटीएमजवळ लोकवस्ती आहे. परंतु कोणताही आवाज या ठिकाणच्या लोकांना आला नाही. पोलिसांनी तपासासाठी श्‍वानपथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले होते. पावसामुळे चिखल झाल्याने श्‍वानपथकाला माग काढता आला नाही. तर ठसे तज्ञांना काही ठिकाणी ठसे मिळून आले आहेत.

No comments

Powered by Blogger.