पाण्यासाठी दुष्काळी भागात भटकंती


सातारा : सातारा जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी पूर्वेकडील माण, खटाव व कोरेगाव तालुक्यातील 15 गावे व 65 वाड्या वस्त्यामधील 21 हजार नागरिकांना आपली तहान 13 टँकरवरच भागवावी लागत आहे. त्यामुळे या भागात दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.जिल्ह्याच्या पुर्वेला मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे. खरीप हंगाम वाया गेलाच. पण रब्बीचे काय होणार याची चिंता शेतकर्‍यांच्या मनात घर करून राहिली आहे. सध्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावली असली तरी पूर्वेकडील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच माण, खटाव व कोरेगाव तालुक्यातील काही भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.

 नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. माण तालुक्यातील पुकळेवाडी, विरळी, पांगरी, जाधववाडी, तोंडले, मोगराळे, भालवडी, पिंपरी, वडगाव, बिदाल व बिजवडी या 11 गावासह शेळकेवस्ती, कापूसवाडी, लांडेवाडी, आटपाडकरवस्ती, बागलवाडी, जमालवाडी, लांडगोबा, मोरदरा, मुलाणीवस्ती, खरातवस्ती, बिरोबानगर, बेरडकी, जाधववस्ती, वाघाडी, चाफेमळा, लोंखडेवस्ती, धुळाची मळवी, बिरोबामंदिर परिसर, जाधववस्ती, निंबाळकरवस्ती, रामोशी आळी, चव्हाणवस्ती, आमजाई, सिध्दनाथमळा, डांगेवाडी, सत्रेवाडी, कदमवस्ती, इनामवस्ती, खरातवस्ती, काटकर बळीपवस्ती यासह 62 वाड्या वस्त्यामधील 16 हजार 674 नागरिकांना 10 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. खंडाळा, फलटण, वाई, पाटण, जावली, महाबळेश्‍वर, सातारा व कराड तालुक्यात पुरेसे पर्जन्यमान झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे.

खटाव तालुक्यातील गारवडी, पाचवड, मांडवे या 3 गावांसह आवळेपठार गावठाण, कठरेवस्ती, पाटीलवस्ती या 3 वाड्यांमधील 3 हजार 110 नागरिकांना 2 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी गावातील 1 हजार 283 नागरिकांना एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

No comments

Powered by Blogger.