चोपडी सोसायटीत १४ लाखांचा अपहार; संचालक मंडळाला अटक


मारूल हवेली: चोपडी ( ता.पाटण ) विकास सेवा सोसायटीत चेअरमन, सचिव व संचालक मंडळाच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या देवाण घेवाणीमध्ये १४ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. प्रकरणी दहा जणांवर पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संचालक मंडळाला अटक केली आहे

चोपडी विकास सेवा सोसायटीत गेल्या २०१२ ते २०१५ या वर्षाच्या व्यवाहाराचे लेखापरिक्षणातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या देवाणघेवाणीमध्ये १४ लाख रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत शासकीय ऑडीटर यांनी पाटण पोलिसात फिर्याद दिली होती. याबाबतचा सहाय्यक पोलीस फौजदार संतोष कोळी यांचेकडे तपास होता. त्यानुसार चोपडी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन, सचिव व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पाटण पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोपडी येथील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून वर्षाला दोन कोटी व्यवहाराची उलाढाल होत असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सोसायटीच्या कारभाराबाबत अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यावर सभासदांनी सहकार निबंधक कार्यालयात धाव घेवुन सदर प्रकरणाची माहिती देवून तातडीने सोसायटीच्या लेखापरिक्षणाची मागणी केली होती. यावर लेखापरीक्षक आशा नलवडे यांनी संपूर्ण दप्तराची तपासणी केली असता यामध्ये संपुर्ण व्यवाहारात अपहार आढळून आला. यामध्ये लेखापरीक्षण आहवलात एकूण 14 लाखाचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

यावर लेखापरीक्षक आशा नलवडे यांनी पाटण पोलिसात धाव घेवून चेअरमन व सचिवासह संपूर्ण संचालक मंडळाविरोधात तक्रार दाखल केली. पाटण पोलिसांकडून तातडीने सर्वांना अटक करण्यात आली. या अफरातफरीमुळे तालुक्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ माजली असून याची सर्वत्र चर्चा होत आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार संतोष कोळी करत आहेत.

No comments

Powered by Blogger.