पाचगणीत बेकायदा हेलिकॉप्टर उड्डाण


पाचगणी : महसूल विभागाची परवानगी न घेता हेलिकॉप्टर उड्डाण केल्याची घटना पाचगणीत मे-जूनच्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिस आता याबाबत कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, या कारवाईने महाबळेश्‍वर परिसरात कायद्याची पायमल्‍ली करणार्‍या धनदांडग्यांचे धाबे दणाणले आहे. वाल्मीकी केंद्रे (रा. वाखाड, पुणे) व दोराब पेशोतन दुभाष (रा. भोसे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. बॉम्बे एन्व्हायर्न्मेंटल ग्रुप ऑफ मुंबई यांनी दि. 28 मे 2018 ते 5 जून 2018 या कालावधीत पाचगणी परिसरात बेकायदा हेलिकॉप्टर उड्डाण केल्याची तक्रार उच्च सनियंत्रण समितीकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी महाबळेश्‍वर तहसील कार्यालयाला गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करताना पाचगणीचे सर्कल विजय ढगे यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात वाल्मीकीकेंद्रे व दोराब दुभाष यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला .

दरम्यान, बॉम्बे एन्व्हायर्न्मेंटल ग्रुपच्या तक्रारीवरून उच्च सनियंत्रण समितीने कडक कारवाई केल्याने पर्यावरण प्रेमींमधून या कारवाईचे स्वागत होत आहे. तपास सपोनि तृप्ती सोनावणे करत आहेत. दरम्यान, इकोसेन्सटीव्ह झोनमध्ये बेकायदेशीर हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी कशी देण्यात आली? हा देखील संशोधनाचा विषय झाला होता. मात्र, धनदांडग्यांकडून कायद्याची पायमल्‍ली करून बेकायदेशीर उड्डाण केले जात असल्याची तक्रार झाल्यानंतरच उच्च सनियंत्रण समितीने याची दखल घेत प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले.

महाबळेश्‍वर तालुक्यात बेकायदेशीरपणे हेलिकॉप्टर उड्डाणाचे बरेच प्रकार सुरु असून यावर कारवाई होणार का? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. जॉय राईडसच्या नावाखाली धनदांडग्यांनी हेलिकॉप्टरचे बेकायदेशीरपणे उड्डाण केल्यामुळे पाचगणीप्रमाणेच बलकवडी धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पाचगणी व महाबळेश्‍वर या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये प्रदुषण करणारी नवनवीन संकल्पना आणण्याचा डाव धनदांडग्यांचा डाव आहे. त्यामुळेच विनापरवाना हेलिकॉप्टरच्या उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याबाबत तक्रारी होत असतानाही प्रशासनाने मात्र हाताची घडी अन् तोंडावर बोट अशी भूमिका घेतली आहे. एखाद्या संस्थेने तक्रार केल्यावर कारवाई केली जाते. मात्र, पर्यावरण प्रेमींनी तक्रार केली की सोयीस्कररित्या केराची टोपली दाखवली जाते.

No comments

Powered by Blogger.