स्वाईन फ्लूने दोघांचा बळी


वाखरी /वेणेगाव : स्वाईन फ्लूचा विळखा अद्यापही कमी झाला नसून रविवारी अंगापूर वंदन (ता. सातारा) व फलटण येथे स्वाईन फ्लूने बळी गेले. फलटण येथे बाळाला जन्म दिल्यानंतर आठव्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. दरम्यान, स्वाईन फ्लू फैलावतच असल्याने घबराटीचे वातावरण कायम आहे.संत बापूदासनगर फलटण येथील एका महिलेचा स्वाईन फ्लूने पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रविवारी दुपारी महिलेचे मृतदेह बापूदासनगर येथे आणल्यानंतर अंत्यसंस्कार

करण्यात आले. याबाबत मिळालेली माहिती अशी, आठ महिन्याच्या गरोदर असलेल्या सौ. सीमा विशाल भुजबळ (वय 28 ) यांना पंधरा दिवसापूर्वी थंडी ताप व अशक्तपणा जाणवत असल्याने फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 4 दिवस उपचार घेऊन त्यांना काहीच फरक न पडल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तपासणी झाल्यावर रक्त, लघवी व अन्य तपासण्या करुन रिपोर्ट आला असता त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे लक्षात आले. त्यादरम्यानच गरोदर असलेल्या सीमा यांचे सिझर करण्यात आले. त्यांना मुलगा झाला. मुलाची प्रकृती चांगली आहे. लहान बाळाला स्वाईन फ्लूची लागण झालेली नाही. त्यांना 6 वर्षाचा आणखी एक

मुलगाही आहे. पुणे येथे 12 ते 13 दिवस उपचार घेतले मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शनिवारी रात्री उशीरा सौ. सीमा भुजबळ यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, सासू, सासरे, दिर, भावजय, दोन मुले असा परिवार आहे. सीमा भुजबळ यांच्या निधनाने भुजबळ कुटुंबावर आभाळच कोसळले आहे.

दरम्यान, अंगापूर वंदन येथील अनंत आप्पाजी कणसे (वय 50) यांचा रविवारी पहाटे पुणे येथील रूबी हॉस्पिटल येथे स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अनंत कणसे यांना सर्दी, खोकला व तापाचा त्रास झाला होता. यासाठी त्यांनी गावातील खाजगी दवाखान्यात प्रथमोपचार घेतले होते. परंतु दोन तीन दिवसांनी काहीच फरक न पडल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथेही त्यांना बरे वाटत नसल्याने व श्वास घेण्यास त्रास होवू लागला. यावेळी तपासणी केले असता कणसे यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

या घटनेनंतर तातडीने त्यांना पुणे येथील रूबी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सूरू होते. परंतु रविवारी पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

No comments

Powered by Blogger.