फलटण बसस्थानक आवारात पाण्याचे तळे : प्रवाशांचे हाल


फलटण : फलटण बसस्थानकाच्या नुतनीकरण व विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असलेतरी पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था तातडीने करण्याची आवश्यकता असताना एसटी प्रशासनाने त्याकडे लक्ष न दिल्याने बसस्थानकावर चक्क पाण्याचे तळे निर्माण झाले असून पाणी साठल्याने प्रवाशांचे हाल झाले.

गेल्या 3/4 दिवसापासून परतीच्या मान्सूनला सुरुवात झाली असून बसस्थानकावर सर्वच प्लॅटफॉर्मसमोर तसेच बारामती बसस्थानकाकडे जाणार्‍या मार्गावर, विनावाहक बस थांब्यासमोर, बसेस जेथून बाहेर पडतात त्या आऊट गेटमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साठून रहात असल्याने प्रवाशांची बसस्थानकावर मोठी कोंडी होत आहे.

प्लॅटफॉर्मसमोर पाणी साठून राहिल्याने बसमध्ये चढताना व उतरताना आणि बसकडे जाताना प्रवाशांना पाण्यातून ये जा करावी लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने वृध्द, महिला आणि विद्यार्थी, विद्यार्थीनींचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र, याकडे एसटी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांची कुचंबना होत आहे.

एसटी प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करुन बसस्थानकावर पाणी साठणार नाही यासाठी वेळीच दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे. सर्वात जास्त उत्पन्न असलेल्या फलटण आगारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून मोठ्या प्रमाणात डास आढळून येत असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे. या मुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.