वृत्तपत्रांना सर्वतोपरी सहकार्य करु : श्रीमंत संजीवराजे


फलटण : पूर्वीच्या काळात बातमीसाठी केवळ वृत्तपत्रांवर अवलंबून राहावे लागत होते. आज पत्रकारिता क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मिडियाचे फार मोठे आक्रमण झाले आहे. अशा बदलत्या परिस्थितीत वृत्तपत्र चालवणे सोपे नसले तरी शाश्‍वत व सविस्तर बातमीसाठी वृत्तपत्रांशिवाय पर्याय नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजवर वृत्तपत्रांनी अनेक सामाजिक क्रांती घडवली आहे. ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी वृत्तपत्रे टिकली पाहिजेत. तालुक्याच्या विकासात स्थानिक वृत्तपत्रांचे मोठे योगदान असून सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या , अशी ग्वाही सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ पुरस्कृत फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानामध्ये ग्रामीण विभागातून सातारा जिल्ह्याला देशात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांचा सत्कार समारंभ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, श्रीराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश देशपांडे, प्रा.रमेश आढाव, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, कृष्णा खोर्‍याच्या माध्यमातून फार मोठी जलक्रांती झाली आहे. इथूनपुढच्या काळात पाण्याच्या नियोजनाला महत्त्व देणे गरजेचे आहे. स्वच्छता अभियानात जिल्ह्याला ग्रामीण विभागातून देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे हे संपूर्ण यंत्रणेचे यश आहे. पत्रकार हा समाजाचा मोठा आधारस्तंभ असून समाजामध्ये बदल घडवण्यासाठी, विकासाची कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी वृत्तपत्रांची साथ आवश्यक असते. 

आज वृत्तपत्रांसमोर प्रचंड आव्हाने जरी असली तरी कालानुरुप बदल करुन त्यांना पुढे जावे लागणार आहे. पत्रकारितेत नव्याने तरुण वर्ग सहभागी होताना दिसत आहे. त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन समाजातील अनेकांच्या मतांचे एकत्रित चित्रण वृत्तपत्रातून उमटत असते त्यामुळे अशा वृत्तपत्रांच्या संपादकांच्यावतीने झालेला आजचा सत्कार फार मोठा आहे, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी आवर्जून सांगीतले.

रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, वृत्तपत्रांचे राज्यपातळीवरचे प्रश्‍न सोडवण्यासाठी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सहकार्य नेहमीच लाभत असते. छोट्या वृत्तपत्रांच्या मालकांना संपादक, प्रकाशक, मुद्रक व विक्रेते अशा एक ना अनेक पातळीवर काम करावे लागते. तालुका पातळीवर काम करत असताना त्यांना अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागते. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून जाहिरात वितरणाचे धोरण काटेकोर पाळले जात नाही. त्यांच्याकडून छोट्या वृत्तपत्रांकडे दुर्लक्ष होते असे सांगून या वृत्तपत्रांना सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रीमंत संजीवराजे यांनी पाठबळ द्यावे, अशी मागणी बेडकिहाळ यांनी केली.

अरविंद मेहता म्हणाले, छोट्या वृत्तपत्रांची चळवळ गतिमान करण्यासाठी त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील वृत्तपत्रे, पत्रकार यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी, शासनाच्या पत्रकारांसाठीच्या सुविधा सर्व पत्रकारांना मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तालुक्याच्या विकासाला गतिमान करण्यासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सुरु असलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या वृत्तपत्रांचा उपयोग करुन घ्यावा, त्यामाध्यमातून छोट्या दैनिक व साप्ताहिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मदत होईल, असेही मेहता यांनी सांगीतले.

प्रारंभी रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते श्रीमंत संजीवराजे यांचा शाल, फेटा, पुष्पगुच्छ व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन कृष्णाथ चोरमले यांनी केले. उपस्थितांचे स्वागत विशाल शहा यांनी केले. सूत्रसंचालन संघाचे सचिव रोहित वाकडे यांनी तर आभार उपाध्यक्ष बापूराव जगताप यांनी मानले.

कार्यक्रमास शहर व तालुक्यातील वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.