आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

रिडिंग न घेताच महावितरणकडून बिलाची वसुली


सातारा : वितरणकडून सर्वसामान्य ग्राहकांची लूट केली जात आहे. अनेक ग्राहकांना रिडिंग न घेताच बिलाचे वाटप केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महावितरणच्या या कारभाराने ग्राहकांना मात्र वाढीव वीज बिलाचा शॉक बसत असल्याचे चित्र आहे.वीज ग्राहकांना बिल देण्याअगोदर मिटरची तपासणी केली जाते. त्याचा फोटो काढला जातो. वीजबिल देताना काढलेला फोटो व मिटरचे रिडिंग स्पष्ट दिसावे, अशा पद्धतीने छापले जाते. त्यानुसार वीज बिलाची आकारणी केली जाते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील महावितरणचा गैरकारभार समोर येत आहे. चुकीची वीज बिले पाठवण्याचा उद्योग महावितरणकडून केला जात आहे. अनेकांना पाठवण्यात आलेल्या वीजबिलावर नावेच लिहली जात नसल्याचे दिसते. तर काही वेळा एकही रिडींग प्रत्यक्ष न घेता बिले पाठवली जात आहेत. ग्राहकांनी वीज बिल वेळेत भरले असतानाही दुसर्‍या महिन्यात वाढीव बिलामध्ये मोठी वाढ दाखवली जात आहे. अनेक जण ऑनलाईन पेमेंट करत असल्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. काहींना तर हे वीज बिल बरोबर असल्याचे सांगून ते भरायला लावले जात आहे.

शहरातील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रतापगंज पेठ, गोडोली व इतर ठिकाणच्या वीज बिल स्वीकारणार्‍या ठिकाणी दिवसभरात सुमारे 150 ते 200 ग्राहक वीज बिल कमी करण्यासाठी येत आहेत. अनेक जण महावितरणच्या कार्यालयात जाऊन तक्रारींचा पाढाच वाचत आहेत. मीटरच्या रिडिंगचा फोटो काढण्याचे काम महावितरणने खासगी एजन्सीला दिले आहे. तरी वीज बिल कमी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना तुम्ही फोटो काढून आणा, मगच आम्ही बिल कमी करू, असे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा हेलपाटे मारावे लागत आहेत. महावितरणचा कारभार आणि नागरिकांच्या डोक्याला ताप झाल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

नोकरी व इतर कामामुळे काही जणांना प्रत्यक्ष महावितरण कार्यालयात जाता येत नाही. त्यामुळे अनेकजण आलेल्या वीजबिलाबाबत वीज कार्यालयात ऑनलाईन तक्रार करतात. त्या तक्रारींवर कोणताच उपाय केला जात नसल्याचे चित्र आहे. दुसर्‍या दिवशी पुन्हा तोच त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे.