आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

जननायकऐवजी नामदार उपाधी लावावी लागणार


खंडाळा : खंडाळा तालुक्याने दिलेले प्रेम यापुढेही कायम ठेवत मकरंद आबांचे नेतृत्व जपावे. आ. मकरंद पाटील यांना यापुढील काळात जननायक या उपाधीऐवजी नामदार ही उपाधी लावावी लागणार असून सत्ता आल्यानंतर खंडाळ्याला मंत्रिपद मिळणार असल्याचे सुतोवाच विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. आ. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खंडाळा तालुक्याच्यावतीने पंचायत समितीच्या किसनवीर स्मारक सभागृहात ना. रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी जि. प. अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, कृषी सभापती मनोज पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, जि. प. सदस्य उदय कबुले, दिपाली साळूंखे, सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदना धायगुडे, अ‍ॅड. शामराव गाढवे, आश्‍विनी पवार, राजेंद्र तांबे, बंडू ढमाळ, महानंदाचे उपाध्यक्ष डी.के. पवार, लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके, बंडा साळुंखे, महाबळेश्‍वरचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार व मान्यवर उपस्थित होते.

ना. रामराजे म्हणाले, मकरंद आबा हे जनतेच्या भल्यासाठी अहोरात्र झटत असतात. खंडाळ्यातील जनतेने दिलेला विश्वास व प्रेम आपण कधीही विसरू शकत नाही. कार्यकर्ते इकडे तिकडे जातील पण सामान्य जनता ही मकरंद आबांबरोबर आहे. यापुढे आबांच्या नावापुढे जननायक ऐवजी नामदार ही उपाधी लावावी लागणार आहे. पाणी आले, औद्योगिकरण झाले. मात्र याचा लाभ येथील जनतेला मिळावा यासाठी लक्ष द्यावे लागेल. बाहेरचे येवून येथे लाभ घेतात. मी यापुढे देवघर प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठीच प्रयत्न करणार आहे. तालुक्यात मला पद मिळाले तरच मी पार्टीचा अन्यथा कुणाचा नाही, असे विचार वाढू लागलेत. जनतेच्याही अपेक्षा वाढू लागल्या आहेत. त्यासाठी यापुढे अधिक वेगाने काम करावे लागेल.

आ. मकरंद पाटील म्हणाले, गेल्या 9 वर्षात खंडाळ्याने मनापासून प्रेम केले. खंडाळा हा यशवंत विचारांचा राजकीयदृष्टया प्रगल्भ तालुका आहे. खंडाळ्याच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक ना. रामराजेंनी पुसला. खंडाळ्याचा टंचाईग्रस्त तालुका म्हणून समावेश झाला आहे. खंडाळ्यातील वेगळ्या विचाराची आपण काळजी करत नाही. वेळ आल्यावर आपली भूमिका स्पष्ट करु. भविष्यात जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुका बनवण्यासाठी प्रयत्न करू. लोणंदमधील लोकांच्या सहकार्याने विकासाचा चेहरा दिला. जनतेने दिलेला विश्वास कधीही ढळू देणार नाही.

संजीवराजे म्हणाले, ना. रामराजे व मकरंद आबांवर खंडाळा तालुक्याने विश्वास दाखवत व प्रेम दिले आहे. मकरंद आबाही कार्यकर्ते व जनतेलाही तितकेच प्रेम देतात. निस्वार्थीपणे काम करणारी तरुणांची फळी आबांबरोबर आहे. ती तालुक्याला निश्‍चितपणे पुढे नेईल. रामराजेंनी औद्योगिकीकरण व पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. मकरंद आबा हे तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे विरोधकांनी धास्ती घेतली आहे.

दत्तानाना ढमाळ म्हणाले, मकरंद पाटील हे सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे मतदार संघातले कार्यकर्ते प्रेम करतात. खंडाळ्यात होऊ घातलेल्या विकास आघाडीची बिघाडी केल्याशिवाय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. सातारा लोकसभा मतदार संघात ना. रामराजेंना उमेदवारी मिळावी, रामराजेंनी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली . जनतेच्या दुःखावर मीठ चोळणार्‍या भाजप सरकारचा कडेलोट करायला तयार रहा, असे आवाहन ढमाळ यांनी केले. यावेळी मनोज पवार यांनी मनोगत व्यक्‍त केले.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त तालुक्याच्या वतीने केक कापून काठी, घोंगडी, पुणेरी पगडी , पुष्पहार व गणपतीची मुर्ती देवून आ. मकरंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध संस्था, संघटना, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आ. पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ यांनी रामराजेंनी आता लोकसभा निवडणूक लढवावी. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत, असे विधान केले. त्यावर बोलताना रामराजे म्हणाले, नाना म्हणतात लोकसभा लढवा पण हे जनतेने ठरवले पाहिजे. जरी फलटण माढ्यात असलेतरी मी खंडाळ्याचा आहे आणि खंडाळा माझा आहे. त्यामुळे पार्टीने ठरवले तर मी लोकसभा लढवेन. शेवटी मकरंदआबांनी सांगायचे मी काय करायचे ते असे म्हणत रामराजेंनी लोकसभा निवडणुकीचा चेंडू आ. मकरंद पाटील यांच्या कोर्टात ढकलला.