आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

स्वाभिमानी उदयनराजेंनी राष्ट्रवादीतून बाहेर पडावे


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंना आज या, आठ दिवसांनी या, असे सांगून त्यांची अवहेलना केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज काय आहेत, हे उदयनराजेंनी दाखवून देऊन स्वाभिमानाने राष्ट्रवादीतून बाहेर पडावे आणि भाजपमध्ये यावे, असे आवाहन भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केले.डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले, खा. उदयनराजेंनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबून आणखी अपमान करून घेऊ नये.

पुणे भेटीत आठ दिवसांनी या, असे त्यांना सांगून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज असतानाही त्यांची अवहेलना ‘राष्ट्रवादी’ने केली. या पक्षात उदयनराजेच बंडखोर आहेत का? उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. आता त्यांनी राष्ट्रवादीत राहू नये. जेम्स लेन प्रकरणात दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी विचारांची लढाई विचारांनी होईल, असे म्हटले होते. मात्र, अशा क्षुल्लक कारणावरून त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. जेम्स लेन प्रकरणाचे मी समर्थन करत नाही. मात्र, राजीनामा न देता संबंधित पुस्तकावर बंदी आणता आली असती. इतर मार्गांचा अवलंबही करता आला असता.

जेम्स लेन हा भाजपचा नव्हता. आताही राष्ट्रवादीने त्यांचा जाहीर अवमानच केला आहे. उदयनराजेंनी आता अस्मिता राखावी. अवहेलना करून घेऊ नये. ज्यांनी अपमान केला त्यांना दाखवून देवून स्वाभिमानाने पुन्हा भाजपमध्ये यावे. माझी राजघराण्यावर पहिल्यापासून निष्ठा आहे. मी राष्ट्रवादीत असताना 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट द्यावं, यासाठी शरद पवार यांच्याकडे मी राजीनामा दिला. त्याहीवेळी उदयनराजेंना सर्वांचा विरोध असताना मी त्यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. आता उदयनराजे भाजपमध्ये आल्यास त्यांना भाजपमधून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे, यासाठी पुढाकार घेईन, असे सांगितले.

भाजपमधील एका गटाचा उदयनराजेंना विरोध आहे, असे विचारले असता डॉ. येळगावकर म्हणाले, सातारा नगरपालिकेत भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांनी मंजूर करुन आणलेल्या निधीतून त्यांची कामे करु दिली जात नव्हती. भाजप नगरसेवकांना डावलले जायचे म्हणून विरोधाची चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी सातार्‍यात उदयनराजेंच्या कार्यक्रमाला उपस्थित रहात असतील तर त्यांना भाजपमध्ये यायला कोणाचा विरोध असेल? असेही डॉ. येळगावकरांनी सांगितले.

उदयनराजेंना राजकारणात मोठे व्हायचे असेल तर बोलण्यावर नियंत्रण ठेवायला हवे. उदयनराजेंवर निस्सीम प्रेम करणारा मी आहे. 1999 साली गोपीनाथ मुंडे यांच्याशी फोन झाल्यावर माझी आमदारकीची निवडणूक सोडून मी उदयनराजेंसाठी सातार्‍यात एसपी ऑफिसला आलो आणि 500 मतांनी माझा तिकडे पराभव झाला. त्यांच्यासाठी मी राजकीय कारकीर्द पणाला लावली. माझ्याइतके त्यांच्यासाठी कुणी केले नसेल, त्यामुळे मला त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांचा अनेकांनी फायदा उचलला पण मी नाही. याचा विचार करुन त्यांनी चांगली माणसे सोबत ठेवावीत, असा सल्लाही डॉ. येळगावकर यांनी दिला.

डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे, ठेकेदाराचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष, वाढते अपघात, प्रशासनाचे दुर्लक्ष, टोलनाका व्यवस्थापनने महिलांशी असभ्यपणे वागणे, गोळीबार, मारामारी यासारखे प्रकार वाढल्याने आनेवाडी टोलनाक्यावर जनआंदोलन छेडावे लागले. त्याप्रकरणात भुईंज, ता. वाई पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मी केलेले आंदोलन लोकांच्या हितासाठी होते, असेही डॉ. येळगावकर यांनी सांगितले.