आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

मंत्रालयातील गोविंद मिल्कच्या स्टॉलला भरघोस प्रतिसाद


स्थैर्य, फलटण (प्रसन्न रुद्रभटे) : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले होते. फलटण येथील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या संस्थेच्या स्टॉलला भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आले. पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात राज्यातील विविध विभागातील नामांकित 15 सहकारी व खासगी दूध संघांचे स्टॉल लावण्यात आले होते. सहकारी व खासगी दूध संघांच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला कालपासूनच गर्दी केली होती. तूप, दही, लोणी,चीज, श्रीखंड, ताक, लस्सी, सुगंधित (फ्लेवर्ड) दूध,पेढे, पनीर,आदी दुग्धजन्य पदार्थांची सवलतीच्या दरात विक्री करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात सुमारे दोन हजार लिटर गाईच्या तुपाची विक्री झाली आहे.

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार आणि दुग्धविकास आयुक्त राजीव जाधव यांनी या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

गोविंद मिल्क सह राज्य शासनाचा‘आरे’, महाराष्ट्र राज्य दूध महासंघ अर्थात ‘महानंद’, ‘कात्रज डेअरी’,,‘कृष्णा’, ‘सोनई’, ‘वारणा’, ‘पराग मिल्क’, ‘प्रभात’, ‘गोकुळ’, ‘श्रायबर डायनॅमिकस’आदी नामांकित ब्रॅण्डसह एकूण 15 दूध संघांचे स्टॉल यामध्ये सहभागी झाले होते