आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

साताऱ्यात खूनप्रकरणी एकावर गुन्हा


सातारा : दारू पित असताना अपशब्द वापरल्यानंतर तिघांमध्ये बाचाबाची होऊन नेलकटरमधील चाकूचा वार झालेला समीर हरिश्चंद्र बनसोडे (रा. पिलेश्वरीनगर, सातारा) या जखमीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी महादू पवार (रा.करंजे) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.मिलिंद लक्ष्मण गायकवाड (रा. करंजे) यांनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तक्रारदार मिलिंद गायकवाड व त्यांचा मामेभाऊ समीर बनसोडे हे दोघे राधिका रोडवर दारू पिण्यासाठी गेले होते. यावेळी त्याठिकाणी असलेल्या महादू पवार याने अपशब्द वापरल्याने समीर याच्याशी वाद झाला. हा वाद मिटवल्यानंतर तक्रारदार मिलिंद गायकवाड तेथून निघून गेले.

महादू पवार याने सव्वासात वाजता समीर बनसोडे यांना फोन करून पुन्हा एसटी स्टँड परिसरात बोलावले. झालेल्या भांडणाच्या कारणातून महादू पवार याने नेलकटरमधील चाकूने समीर यांच्या पोटावर वार केले. या घटनेत ते जखमी झाल्याने सिव्हिलमध्ये उपचार सुरू होते. उपचार घेतल्यानंतर दि. १२ रोजी जखमी समीर यांना पुन्हा त्रास होऊ लागला. उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र दि. १४ रोजी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

संशयित महादू पवार याने चाकूने वार केल्यानेच मृत्यू झाल्याचे समीर बनसोडे यांच्या कुटुंबियांनी आरोप केले. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात महादू पवार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.