Your Own Digital Platform

तडीपार मटका किंग समीर कच्छी दहा दिवसात दोनदा जेरबंद


सातारा : साताऱ्यातील नामचीन मटका किंग समीर कच्छी याने तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी रविवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) त्याला जेरबंद केले. दरम्यान, दहा दिवसांत तो दोनदा साताऱ्यात खुलेआम फिरताना आढळला आहे.समीर कच्छी याच्यावर अवैध मटका चालवल्याप्रकरणी सातारा शहर, सातारा तालुका, शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय मारहाणीचे काही गुन्हे दाखल असल्याने त्याला सातारा जिल्ह्यातून तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी तडीपार केले आहे. तडीपारीची कारवाई असतानाही तो साताऱ्यात खुलेआम फिरत असल्याचे वास्तव आहे. रविवारी रात्री तो साताऱ्यात आला असल्याची माहिती एलसीबी पोलिसांना मिळाली. पोलिसांचे एक पाथक तयार करून त्याचा शोध घेत असताना तो सापडला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान, दि. 29 सप्टेंबर रोजीही समीर कच्छी साताऱ्यातील घरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी मटका चालवत असलेल्या समीर समीर कच्छीच्या घरी (रा. सैदापूर) छापा टाकला. यावेळी पोलिसांनी महागड्या मद्यासह एलसीडी, प्रिंटर, झेरॉक्‍स मशिन, संगणक, जुगार खेळण्याचे साहित्य तसेच रोख रक्कम असा सुमारे एका लाखाचा मुद्देमाला जप्त केला.

समीर कच्छी दहा दिवसांत दोनदा पोलिसांना सापडला आहे. या अगोदरही त्याने तडीपार आदेशाचे उल्लंघन केले आहे. यामुळे पोलिस आता त्याच्यावर पुढील कोणती कठोर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, पोलिस हवालदार बंडा पानसंडे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, मोहसीन मोमिन, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.