तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीला अटक


सातारा : विद्युत मंडळाच्या डीपीतील तांब्याच्या तारा चोरी करणार्‍या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) अटक केली. यावेळी संशयितांकडून कारमधून घेवून जाणाऱ्या तांब्याच्या तारा, एक दुचाकी, मोबाईल असा एकूण ४ लाख २५ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विजय बाळकृष्ण पवार (वय २७), गणेश अंकुश पवार (वय १९), अमर अशोक पवार (वय २८ सर्व रा.आरफळ), ऋषीकेश भानुदास घाडगे (वय २२, रा.शिवथर), सचिन प्रकाश चव्हाण (वय २४), मंगेश बाळासो चव्हाण (वय २६, दोघे रा.मानेवाडी सर्व ता.सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. पोलिस चोरट्यांच्या मागावर असतानाच एलसीबीच्या पथकाला काहीजण करंजेनाका येथे चोरी केलेल्या तांब्याच्या तारा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने सापळा रचून कार व दुचाकीस्वंराना पकडून पोलिसांनी कारमधील चौघांकडे व दुचाकीवरील दोघांकडे चौकशी केली. त्या कारची पाहणी केली असता त्यामध्ये तांब्याच्या तारा आढळून आल्या. चौकशी केल्यानंतर संशयितांनी तांब्याच्या तारा बिचुकले, अनपटवाडी व आनेवाडी टोलनाका परिसरातून चोरल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तो सर्व मुद्देमाल जप्त केला व संशयितांना एलसीबीच्या कार्यालयात आणले. पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट, फौजदार सागर गवसणे, पोलिस हवालदार विलास नागे यांनी ही कारवाई केली.

No comments

Powered by Blogger.