झेडपीतील ११३ कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा


सातारा : सातारा जिल्हा परिषदेमध्ये कामात हलगर्जीपणा करणार्‍या व लेटलतीफ 113 कर्मचार्‍यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी वेळेत आपल्या कार्यालयात उपस्थित नसतात. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी आल्या होत्या. तसेच अधिकार्‍यांनीही संबंधित विभागांना अचानक भेटी दिल्या होत्या. त्यावेळी अनेक अधिकारी व कर्मचारी गायब असल्याचे निदर्शनास आले. तसेच काहीवेळा तर विविध विभागातील हजेरी बुकही प्रशासनामार्फत ताब्यात घेण्यात आले होते. 

त्यावेळी अनेक कर्मचारी व अधिकार्‍यांच्या सह्या नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांना सूचना करून संबंधित कर्मचार्‍यावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कामात कुचराई करणार्‍या व लेटलतीफ कर्मचार्‍यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सुमारे 113 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच त्यांच्या रितसर रजाही मांडण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेमधील कर्मचार्‍यांना शिस्तीबाबत प्रशासनामार्फत आदेश काढण्यात आले होते मात्र या आदेशालाच कर्मचार्‍यांनी कोलदांडा लावला आहे. अनेक कर्मचार्‍यांच्या खिशावर ओळखपत्र नसल्याने कार्यालयातील कर्मचारी आहे का? नागरिक असा प्रश्‍न कामानिमित्त येणार्‍या लोकांना पडतो.तसेच चतुर्थश्रेणीमधील कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या गणवेशात दिसत नाहीत. त्यासाठी प्रशासनाने संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

No comments

Powered by Blogger.