ग्रेड सेपरेटरचे काम तातडीने पूर्ण करा खा. उदयनराजे


सातारा : सातारा शहरातील  वाहतूक कोंडी कायमची संपवण्यासाठी ग्रेड सेपरेटर  हा अभिनव पर्याय सातार्‍यात आणला गेला आहे. हे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. सातारकरांनी आत्तापर्यंत या कामासाठी दिलेले सहकार्याची नोंद घेत या प्रकल्पाचे जनक खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पोवई नाक्यावर मुख्य अभियंत्यांसह प्रकल्पाच्या ठेकेदारांना घेवून ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी केली. उरलेले काम तातडीने पूर्णत्वाला न्या, अशा सूचना खा. उदयनराजे यांनी मुख्य अभियंता व प्रकल्प ठेकेदारांना दिल्या.सातारा शहरातील वाहतूक कोंडी कायमची संपवण्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून  ग्रेड सेपरेटर हा अभिनव प्रकल्प सातार्‍यात आणला गेला.

कायमची वाहतूक कोंडी संपणार असल्याने सातारकरांनी खुदाईसह  वळवलेली वाहतूक सहन करत खा. उदयनराजेंच्या संकल्पनेला सहकार्य केले. बुधवारी खा. उदयनराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस.एस. साळुंखे, अधीक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता वाघमोडे, उपअभियंता अहिरे यांच्यासह प्रकल्पाच्या ठेकेदारांना घेवून ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी केली. कामाच्या प्रत्येक ठिकाणी जावून उदयनराजेंनी अभियंता व ठेकेदारांना नागरिकांनी सांगितलेल्या सूचनांची माहिती दिली. नागरिकांनी केलेल्या सहकार्याची नोंद घ्या, असेही उदयनराजेंनी  अभियंत्यांना सांगितले. आत्तापर्यंत केलेल्या कामाबद्दल उदयनराजेंनी समाधान व्यक्‍त केले. उरलेले काम दुप्पट वेगाने सुरू ठेवा.

सातारकरांना मला वाहतूक कोंडीतून कायमचे मुक्‍त करायचे आहे. या कामाला मी प्राधान्य दिले आहे याची नोंद घ्या, अशा शब्दात उदयनराजेंनी अभियंते व  ठेकेदारांना सूचना दिल्या. मूळ प्रकल्पामध्ये ग्रेड सेपरेटरचा स्लॅब   बालाजी प्राईडपर्यंत होता. मात्र, नागरिकांनी खा. उदयनराजेंची  भेट घेतली व हा स्लॅब रयत शिक्षण संस्थेपर्यंत वाढवण्याची मागणी केली. त्यानंतर खा. उदयनराजेंनी अधीक्षक अभियंता शरद राजभोज यांची बैठक घेवून हा स्लॅब वाढवून घेतला.   खा. उदयनराजेंनी अभियंत्यांसमवेत जावून त्याचीही पाहणी केली. खा. उदयनराजेंनी मुख्य अभियंता साळुंखे यांच्यासमोर अधीक्षक अभियंता शरद राजभोज यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. अत्यंत वेगाने काम करून घेणारे अधीक्षक अभियंता तुम्ही सातार्‍याला दिले आहेत याचा अभिमान वाटतो, अशा शब्दात खा. उदयनराजे यांनी राजभोज यांच्याबद्दल गौरवोद‍्गार काढले.

यावेळी राजभोज यांनी प्रकल्पाची माहिती उदयनराजे व  मुख्य अभियंत्यांना दिली.  प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आपण अधिकारी व ठेकेदारांना दिल्या आहेत, असेही राजभोज म्हणाले.
यावेळी शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनील काटकर, प्रताप शिंदे, बाळासाहेब ढेकणे उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.