प्‍लास्टिक बंदी झुगारणार्‍या नवरंग, हिरामोती, धनलक्ष्मीवर कारवाई


सातारा : राज्य शासनाने बंदी घातलेल्या प्‍लास्टिकचा सर्रास वापर करणार्‍या नवरंग, हिरामोती, धनलक्ष्मी, सप्‍ततारा ड्रेसेस, दीपलक्ष्मी, महावीर एम्पोरिअम या दुकानांवर सातारा नगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली. पाचही दुकानांना एकूण 30 हजारांचा दंड करण्यात आला असून, त्यांच्याकडून 90 किलो प्‍लास्टिक जप्‍त करण्यात आले.

राज्य शासनाने प्‍लास्टिक बंदी केली. त्यावेळी सातार्‍यातील काही बड्या व्यापार्‍यांनी प्‍लास्टिक बंदीला विरोध केला. सातारा पालिकेत मुख्याधिकार्‍यांची भेट घेऊन मुदतवाढ देण्याची मागणी केली. मात्र, त्यांची मागणी मान्य झाली नाही. कारवाईचा इशारा मिळाल्यावर काही व्यापार्‍यांनी बंदी असलेल्या जुन्या प्‍लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सुरु केला. त्यातील काहीजणांवर कारवाई झाली. मात्र, गोडाऊनचा स्टॉक काही व्यापारी, दुकानदार, विक्रेते बाहेर काढत असल्याने अशा व्यापार्‍यांवर कारवाई सुरु आहे.

सातार्‍यात सोमवारी नगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी बेकायदा प्‍लास्टिकप्रकरणी कारवाई केली. पोवईनाका कासट मार्केटमधील सुशांत नावंधर यांचे नवरंग, विनोद राठी यांचे हिरामोती कलेक्शन, गणेश दळवी यांचे सप्‍ततारा ड्रेसेस तसेच नंदिनी मॅचिंग सेंटर, दिपलक्ष्मी, महावीर एम्पोरिअम या दुकानांतून 90 किलो नॉन ओव्हन प्‍लास्टिक कॅरिबग जप्‍त करण्यात आला. सहा जणांना प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 30 हजार दंड करण्यात आला असल्याची माहिती नगरपालिकेतून देण्यात आली. ही कारवाई मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ भाग निरीक्षक राजेंद्र कायगुडे, भाग निरीक्षक दत्‍ता रणदिवे, प्रविण यादव, गणेश टोपे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डचे गोरे, जगदाळे, शिंदे यांनी केली.

सातार्‍यात अद्याप बंदी घातलेले प्‍लास्टिक मोठ्या प्रमाणावर कचर्‍यात येत आहे. या प्‍लास्टिकचा पुनर्वापर करता येत नसल्यामुळे नगरपालिकेला मोठ्या संकटाला समोरे जावे लागत आहे. प्‍लास्टिक बंदी कायद्याचे उल्‍लंघन करणारी दुकाने सील करुन त्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातार्‍यात चोरीछुपके बंदी घातलेले प्‍लास्टिक वापरात आणले जात असून कायद्याचे उल्‍लंघन केले जात आहे. प्‍लास्टिक बंदी झुगारणारे व्यापारी, दुकानदार यांची दुकाने सील करुन त्यांचे दुकान परवाने रद्द करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

No comments

Powered by Blogger.