मशीनचे झाकण लागून कामगाराचा मृत्यू


कराड : काले तालुका कराड गावच्या हद्दीत मुधाई डेअरीमध्ये काम करणारा कामगाराला मशीनचे झाकण लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आज, सोमवार (दि.२२) दुपारच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. उमेशकुमार हिंगूराम यादव असे या मृत कामगाराचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दूध डेअरीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कराड तालुक्यातील काले गावच्या हद्दीत पाचवड फाटा येथे मुधाई दूध डेअरीमध्ये परिसरातील दूध संकलित केले जाते. त्या दुधावर प्रक्रिया करून सुगंधी दूध तयार करून ते दूध विक्रीसाठी पाठवली जाते. नेहमीप्रमाणे आज, सोमवार सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास डेअरीचे कामकाज सुरू झाले. नेहमीप्रमाणे कामगारांनी डेअरीमध्ये संकलित झालेले दूध बाटल्यांमध्ये भरून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्या बाटल्या विशिष्ट मशीन मध्ये ठेवल्या. त्यानंतर त्या मशीनचे झाकण लावून कामगार महिला जेवणासाठी तेथून निघून गेल्या.

दरम्यान, मशीनवरती काम करणाऱ्या कामगाराने मशीनचे झाकण व्यवस्थित न लावता मशीन सुरू केली. मशीन विशिष्ट तापमानाला गेल्यानंतर मशिनमध्ये दाब वाढल्याने प्रचंड प्रेशर निर्माण होऊन मशीनचे झाकण जोरात उघडले. ते झाकण बाजूलाच उभा असलेल्या उमेशकुमार यादव याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मशीनमध्ये निर्माण झालेल्या प्रेशरमुळे मशीन साधारणपणे दोन फूट बाजूला सरकली होती. सुपरवायझरने ही बाब डेअरी मालक व पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली.

No comments

Powered by Blogger.