भवानी तलवारीची शाही मिरवणूक


सातारा : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सातारच्या जलमंदिर पॅलेस येथे विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा उत्साहपूर्ण, मंगलमय वातावरणात व अलोट गर्दीत पार पडला. प्रारंभी राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत जलमंदिर पॅलेस येथे खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, युवराज श्री. छ. वीरप्रतापसिंहराजे यांच्या हस्ते श्री भवानी तलवारीचे पुजन करण्यात आले. त्यानंतर भवानी तलवारीची शाही मिरवणूक काढण्यात आली. जलमंदिर येथे भवानी तलवारीचे विधीवत पूजन झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता शाही मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी ढोल-ताशा व हलगी वाद्य पथक होते. आकर्षक व विविधरंगी फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये श्री भवानी तलवार ठेवण्यात आली होती. पालखीच्या पुढे सनई-चौघडा वाजत होता. पालखीच्या दोन्ही बाजूला शिंग-तुतार्‍यांचा निनाद होता.मिरवणूकीच्या अग्रस्थानी अश्‍वधारी पथक त्यावर छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंची वेशभुषा केलेले बालकलाकर व मावळे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणुकीत फेटेधारी मावळे, युवक व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

मिरवणूक पोवईनाक्यावर पोहोचल्यावर तेथे तयार करण्यात आलेल्या व्यासपीठावर खा.श्री.छ. उदयनराजे भोसले व युवराज श्री.छ. वीरप्रतापसिंहराजे यांच्या हस्ते श्री भवानी तलवारीचे पुजन करण्यात आले. पुजन झाल्यावर खा. उदयनराजे भोसले यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवईनाक्यावरील पुतळयाला पुष्पहार अर्पण केला. यावेळी हजारो नागरिक, मान्यवर उपस्थित होते.
राजघराण्यातील परंपरेप्रमाणे सीमोल्लंघनानंतर श्री भवानी तलवारीसह ही मिरवणूक पुन्हा जलमंदिर पॅलेस येथे दाखल झाली. तेथे विधीवत पुजन आणि औक्षण झाल्यावर राजमाता श्री.छ. कल्पनाराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, युवराज वीरप्रतापसिंहराजे, युवराज्ञी नयनताराराजे भोसले यांनी उपस्थित नागरिकांकडून आपटयांच्या पानेरुपी सोन्याचा स्वीकार केला आणि तेथून खर्‍या अर्थाने सातारवासियांनी आप्त-स्वकीयांसह सोने लुटले.

No comments

Powered by Blogger.