Your Own Digital Platform

रयत संकूल लोणंदच्या वतीने कर्मवीर जयंतीचे आयोजन


लोणंद : रयत शिक्षण संस्था शताब्दी महोत्सवानिमित्त रयत संकूल लोणंद आयोजित रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील (डी.लिट) यांचा १३१ वा जयंती समारंभ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज (मुलींचे) लोणंद येथील प्रांगणात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द व्याख्यात्या अॅड. अपर्णाताई रामतीर्थकर व अध्यक्षस्थानी डी.जे.काॅलेज आॅफ काॅमर्स सातारचे उपप्राचार्य डाॅ.लालासाहेब घाटगे होते.

प्रमुख उपस्थितीमध्ये लोणंदच्या नगराध्यक्षा सौ.स्नेहलता शेळके-पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डाॅ.नितीन सावंत, हणमंत शेळके-पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जगदीश मर्दा, रतनसी पटेल, शिरीष मेहता, माजी सभापती शिवाजीराव शेळके-पाटील, नगरसेवक सौ.शैलजा खरात, केंद्रप्रमुख डी.बी.धायगुडे, बी.जी. कोळपे सर,आदि मान्यवर व रयत संकूलातील शिक्षक-शिक्षकेत्तर सेवकवर्ग व विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज(मुलींचे) व मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर काॅलेज मधील इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम आलेले विद्यार्थी व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृती मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमुख अतिथी मा.अपर्णाताई रामतीर्थकर यांनी आपल्या भाषणात स्वतःच्या जीवनाचा खडतर प्रवास सांगताना २५ वर्ष संसार केल्यानंतर चाळीशीत महाविद्यालयीन शिक्षण घेऊन अॅडव्होकेट पदापर्यंत वाचनातून व वडिलांच्या प्रेरणेतून पोहोचल्याचा उल्लेख केला. कर्मवीरांनी व लक्ष्मीबाईंनी वंचित घटकांची भूक भागवली आहे. त्या म्हणाल्या की, स्वतःमुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येत असेल तर ते दुर्देवी आहे. परंतु स्वतःसाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येत असेल तर ते जीवनाचे सार्थक होऊ शकते. हल्लीच्या तरूणाईने नकार पचविण्याची ताकद निर्माण केली पाहिजे. कुठल्याही क्लासमध्ये जाऊन व्यक्तिमत्त्व घडत नसते तर स्वतःलाच प्रयत्न करून व्यक्तिमत्त्व घडवावे लागते.

 त्यासाठी मुलांना मार्कवंत बनविण्यापेक्षा गुणवंत बनविले पाहिजे. सध्याच्या मुलींना जास्त धोके निर्माण होत आहेत म्हणून सर्व मातांनी पाल्यासाठी सतर्क राहिले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात असलात तरी आपण महिला आहोत ही भावना कायम मनामध्ये असली पाहिजे. 'थोर स्री व्हा पण थोर पुरूष व्हायला जावू नका' असा संदेशही दिला. मुली व महिलांवर सगळ्यात जास्त अत्याचार जवळचे नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती व घरी घेऊन जाणार्‍या व्यक्तींकडून झाल्याचे लक्षात येत आहे. सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिक्षणाचा व संस्काराचा उपयोग कुटुंबव्यवस्थेतही व्हायला हवा. मोबाईलच्या चुकीच्या वाढत्या वापराने कुटुंबव्यवस्था ढासळली आहे. वृध्दांच्या समस्येत उत्तरोत्तर वाढ होत आहे. अशा अनेक कौटुंबिक व सामाजिक विषयाला हात घालून अनेक दाखल्यांच्या आधारे उपस्थितांना उपदेशाचे डोस अपर्णाताई रामतीर्थकर यांनी दिले.
प्रास्ताविक प्राचार्य एस.व्ही.माने यांनी तर सूत्रसंचालन डाॅ.संजीव बोडखे व आभार प्राचार्य श्री.के.एम.देठे यांनी मानले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन रयतचे जनरल बाॅडी सदस्य श्री.हरिभाऊ माने व रयत संकूलाचे प्राचार्य डाॅ. टी. एन. घोलप, श्रीमती एस.व्ही.माने व श्री.के.एम.देठे यांनी केले. ( छाया प्रतिक भोईटे, आरडगांव, लोणंद येथे कर्मवीर जयंती कार्यक्रमावेळी बोलताना अंड, अपर्णा रामतिर्थकर समवेत लोणंदच्या नगराध्यक्षा मा.सौ. स्नेहलता शेळके पाटील, डी.जी कॉलेज सातारचे उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घाटगे, डॉ. नितिन सावंत आदी मान्यवर