तासवडे एमआयडीसीचे दूषित पाणी कृष्णेत


तासवडे टोलनाका : तासवडे (ता. कराड) येथील एमआयडीसीमधील काही कंपन्यांनी जानाई ओढ्यात केमिकलयुक्‍त व दूषित पाणी सोडल्याची धक्‍कादायक घटना रविवारी समोर आली आहे. हा ओढा कृष्णा नदीला मिळत असल्याने तालुक्यातील नदीकाठच्या गावच्या पिण्याच्या पाण्यावरही याचा विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर ओढ्यातील मासे मृत झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.तासवडे एमआयडीसीलगत जानाई ओढा असून हा ओढा तासवडे गावाजवळ कृष्णा नदीला मिळतो. नदीकाठच्या गावासह सातारा, सांगलीसह अनेक गावच्या पिण्याच्या पाणी योजनांसाठी कृष्णा नदीतूनच पाण्याचा उपसा होतो. त्यामुळेच या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

जानाई ओढ्यात केमिकलयुक्‍त कंपन्यांमधील दूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेविना सोडण्यात आल्यानंतर रविवारी ओढ्यालगत तळबीड परिसरातील चव्हाण वस्ती, शिंदे वस्तीसह माळी वस्तीच्या परिसरातील सुमारे 20 अधिक विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. या विहिरींतील पाण्याचा उपयोग शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असल्याने या परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांसह ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

केवळ विहिरींतीलच नव्हे, तर जानाई ओढ्यातील पाणी लाल होऊन त्या ठिकाणचे मासे मृत झाले आहेत. याशिवाय ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तासवडेसह तळबीड ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेकदा कंपन्यांच्या मालकांना निवेदने दिली असून दुषित पाणी, केमिकल ओढ्यात सोडू नका असे सांगितले आहे. मात्र त्यानंतरही वारंवार असे प्रकार होत असून परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ केला जातो. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच प्रशासन कोणती भूमिका घेणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments

Powered by Blogger.