Your Own Digital Platform

वडूजमध्ये शोले स्टाईल आंदोलन


वडूज : राज्य शासनाने नुकतीच राज्यातील 201 तालुक्यांची दुष्काळी तालुका म्हणून यादी जाहीर केली आहे. परंतु, यामध्ये खटावमध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही खटावचा या यादीत समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे तालुक्यात संतप्त वातावरण निर्माण झाले असून, शासनाचा निषेध केला जात आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर बुधवारी दिवसभर वडूजसह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन केले.खटावचा दुष्काळी तालुका म्हणून नोंद न केल्याने तालुक्यात सरकारविरोधात रोष निर्माण झाला आहे. त्याचाच परिपाक म्हणून वडूजसह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी सकाळी 11 वाजल्यापासून शोले स्टाईल आंदोलन केले. दिवसभर तालुक्यातील राजकीय नेते व काही पदाधिकारी या ठिकाणी भेट देत होते. यावेळी सामाजिक संघटनेमध्ये येथील शहाजीराजे गोडसे मित्रमंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अभेद सामाजिक संघटना, मानवाधिकार संघटना विविध गावचे सरपंच यांच्यासह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. तर आंदोलनस्थळी रुग्णवाहिकेसह मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा, खटाव तालुक्याचा यादीत समावेश झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विशेषतः हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी संजय पाटील, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा शिंगण यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

घोषणाबाजी करत ढोलताशांच्या आवाजात हे आंदोलन होत असल्याची चर्चा परिसरात वार्‍यासारखी पसरताच तालुक्यातून अनेक नागरिकांनी याठिकाणी हजर होते. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. मात्र, जिल्हाधिकार्‍यांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली नव्हती.आंदोलनस्थळी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, डॉ. दिलीप येळगावकर, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वोगोड , स्वाभिमानाचे राज्य प्रवक्ते अनिल पवार आदी सह विविध पक्षाच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी भेटी दिल्या. त्यांनीही आंदोलन थांबवून चर्चा करण्याची मागणी केली. परंतु, आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांशीच चर्चा करण्याचा होरा ठेवल्याने दिवसभर हे आंदोलन सुरूच राहिले होते.