खासगी डॉक्ट, मेडिकलवाल्यांनी बाजार मांडू नये : दिपक सावंत


सातारा : सातार्‍यासह नाशिक पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात वातावरण हे स्वाईन फ्लूसाठी पोषक आहे. हा प्रदुर्भाव वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करा.जनजागृताठी शालेय विद्यार्थी केंद्र बिंदू ठेवून त्यांना ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून त्यांचा उपयोग करावा. तर खासगी डॉक्टरासह मेडीकलवाल्यांनी बाजारूपणा न करता सेवाभावीवृत्तीने रूग्णांना सेवा द्यावी. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी दिला.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात स्वाईन फ्लूबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, आरोग्य विभागाचे उपसंचालक नितीन बिलोलीकर, उपविभागीय अधिकारी किर्ती नलावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर, डॉ. उज्वला माने उपस्थित होते.

ना. दिपक सावंत म्हणाले, खासगी मेडिकल धारकांनी स्वाईन फ्लूची औषधे त्यांना ठरवून दिलेल्या दरातच विक्री करावी. जादा दराने विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा मेडिकलधारकांवर कारवाई केली जाईल. भविष्यात डेंगूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. वेळेत उपचाराने स्वाईन फ्लू आजार निश्‍चितपणे बरा होऊ शकतो. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये यावर मोफत उपचार केले जातात. डॉक्टरांनीही आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करुन स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी प्रयत्न करावा.

श्‍वेता सिंघल म्हणाल्या, स्वाईन फ्ल्यूूचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासून उपाययोजना सुरु केल्या होत्या. स्वाईन फ्ल्यू लक्षणे व उपचार या विषयी प्रसारमाध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. ज्या भागात स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळत आहे त्या भागातील प्रत्येक घरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. स्वाईन फ्ल्यूचा आणखीन प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकार्य करावे.

डॉ. कैलास शिंदे म्हणाले, स्वाईन फ्लू रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली आहे. आरोग्य विभागाकडे औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. यापुढे एसटीमधून प्रवास करणार्‍या प्रवशांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. डॉ. नितीन बिलोलीकर व डॉ. भगवान पवार यांनी स्वाईन फ्ल्यूची लक्षणे व उपचार कसे करावे याची माहिती दिली. या कार्यशाळेला वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

स्वाईन फ्ल्यूूने हाहाकार उडाला असताना स्वाईन फ्ल्यू हा आजार दररोज प्रवास करणार्‍या नोकरदार वर्गामधून झालेला दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने त्याचा सर्व्हे करून त्याची तत्काळ माहिती आमच्याकडे सादर करावी, अशा सूचना देत सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण पूणे विभाग पिंजून काढा, अशा सूचना डॉ. दिपक सावंत यांना आरोग्य उपसंचालक बिलोलीकर यांना दिला.

No comments

Powered by Blogger.