Your Own Digital Platform

लाचप्रकरणी तलाठी 'जाळ्यात'


सातारा : पोल्ट्री फार्मचे बांधलेले शेड सातबारा उतारावर नोंद करुन दाखला देण्यासाठी एका तलाठ्‍याने ३ हजार रुपयांची लाच मागीतली. यानंतरच्या तडजोडीअंती २ हजार रुपयांचा हा व्यवहार ठरला. ही २ हजारांची लाच स्वीकारताना पाडळी (सातारारोड ता.कोरेगाव) येथील तलाठी अजिनाथ महादेव पालवे (वय 38, मूळ रा.मेहकरी जि.अहमदनगर) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार यांच्या आईच्या नावावर शेतजमीन असून, त्यामध्ये पोल्ट्री फार्म उभा केलेला आहे.

त्या पोल्ट्री फार्मची नोंद सातबारा उतार्‍यावर करण्यासाठी तक्रारदार हे पाडळी गावच्या ग्रामपंचायतीचा तलाठी अजिनाथ पालवे याच्याकडे गेले. पोल्ट्री फार्मबाबत माहिती दिल्यानंतर संबंधित कामासाठी पालवे याने 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी सातारा येथील एसीबी विभागात तक्रार दिली.

तक्रार दाखल झाल्यानंतर त्याबाबत पडताळणी केली असता, लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. यावेळी तक्रारदार यांनी 3 हजार रुपयांऐवजी 2 हजार रुपये देणार असल्याचे सांगितल्यानंतर बुधवारी सकाळी लाचेची रक्कम घेण्याचे ठरले. ग्रामपंचायत कार्यालयातच लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबी विभागाने पालवे याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. या कारवाईनंतर तलाठी अजिनाथ पालवे याच्याविरुध्द कोरेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी विभागातर्फे करण्यात आले आहे.