दहा दिवसांत भावांचा मृत्यू


सातारा : लहान भावाचा स्वाईन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी दहाव्याच दिवशी मोठ्या भावाचाही मृत्यू झाल्याची घटना सातार्‍यात घडली.गुरुवारी मृत झालेल्या संजय महाडिक यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होेते. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसून प्राथमिक माहितीनुसार काविळीमुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संजय महाडिक यांचा गुरुवार, दि. 4 ऑक्टोबर रोजी तर त्यांचे लहान बंधू मनोज महाडिक यांचा दि. 25 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. यातील मनोज महाडिक यांच्यावर सातार्‍यात खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांना स्वाईन फ्लू सदृश आजार झाला असल्याचे समोर आले. दुर्देवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे महाडिक कुटुंबियांवर आघात झाला होता. या घटनेपाठोपाठ मनोज यांचे मोठे बंधू संजय महाडिक यांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातार्‍यात उपचार सुरु होते.

उपचार सुरु असताना प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याऐवजी बिघाड होत गेल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी त्यांचाही मृत्यू झाला. दहा दिवसांमध्ये दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने महाडिक कुटुंबिय अक्षरश: हादरुन गेले आहे. या घटनेची माहिती कुटुंबियांना समजताच त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे मृत सख्खे भाऊ मेडिकल व्यवसायिक आहेत.

सातारा शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. स्वाईन फ्लूची लक्षणे प्रथमदर्शनी समोर आल्यानंतर तो बरा होतो. सिव्हील रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे उपचार घेणार्‍यांचे प्रमाण अधिक आहेे. खासगीमध्ये रुग्ण उपचार घेत असताना मात्र मृत्यूनंतर त्यांच्या ‘मृत्यूच्या कारणाबाबत’ (डेथ कॉझ) चालढकल होत असल्याची शंका बळावली आहे. अशा रुग्णांवर उपचार सुरु असताना व प्रामुख्याने मृत्यू झाल्यानंतर त्याचे रिपोर्टींग सिव्हील हॉस्पिटलला करणे क्रमप्राप्त आहेे. दुर्देवाने अनेक केसेसमध्ये असे होत नाही. यामुळे रुग्णांचा मृत्यू होतोय पण तो कशाने मरतोय? याबाबतचे गूढ कायम राहत आहे.

No comments

Powered by Blogger.