वाढदिवसाचे फलक लावणाऱ्या पाच जणांना कारने चिरडले


मारूल हवेली : कराड-पाटण राज्यमार्गावरील अडुळपेठ ( ता. पाटण ) येथे वाढदिवसाचा फ्लेक्स लावत असणार्‍या पाच जणांना भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने चिरडले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. यात एकजण गंभीर तर तीन जण जखमी झाले आहेत.

या अपघातात साहील दिनकर निवडुंगे ( वय १९ ) याचा शुक्रवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर जखमींपैकी महेश दत्तात्रय शिर्के (वय १९) हा गंभीर जखमी झाला आहे. रवींद्र शिवाजी नलवडे ( वय २०), गणेश रामचंद्र शिर्के ( वय १८ ) व किशोर दत्तात्रय शिर्के ( वय १८ ) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार करण्यात येत आहेत. हे सर्वजण अडूळ येथील रहिवाशी आहेत.गावातील एका व्यक्तीचा शनिवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या शुभेच्छाचा बॅनर लावण्यासाठी शुक्रवारी रात्री ११ वाजता साहिल, महेश, रविंद्र, गणेश व किशोर हे गेले होते. कराड-पाटण राज्यमार्गावर हा बॅनर लावत असताना तवेरा गाडीने या पाच जणांना उडविले. 

 अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमींना कराड येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र साहील याचा रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर आहे. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साहील याचा अपघातात मृत्यू झाल्याने अडूळ गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद पाटण पोलिसात झाली असून चालक अक्षय विलास डिगे ( वय २४, रा. अडूळ) यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

No comments

Powered by Blogger.