नगरसेवक विशाल जाधववर गुन्हा


सातारा : सदरबझार येथील कार्यालयात पालिका कर्मचारी दिलीप सकटे यांना शिवीगाळ करून मशिनची तोडफोड केल्याप्रकरणी साविआचे नगरसेवक विशाल जाधव यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील शेकडो कर्मचारी पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडून बसल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, डीवायएसपी समीर शेख यांनी कोणालाही पाठीशी न घालता कायद्यानुसार कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हा तणाव निवळला.सदरबझार प्रभाग क्रमांक 3 मध्ये डुक्कर मेल्याने ते उचलण्याचे काम नगरसेवक जाधव यांनी पालिका कर्मचारी सकटे यांना फोनवरून सांगितले होते.

 मात्र, त्या भागातील घंटागाडी पंक्चर असल्याने शुक्रवारी सकटे यांना काम करता आले नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी 8 च्यादरम्यान सदरबझार येथील पालिका कार्यालयात कर्मचार्‍यांची हजेरी सुरु असताना नगरसेवक जाधव तिथे आले आणि माझ्या प्रभागात कोणीच काम करायचे नाही, असे सुनावले. यावेळी सकटे हे वस्तूस्थिती सांगत असताना संतापलेल्या जाधव यांनी सकटे यांना एकेरीवर घेत दमदाटी केली. तद्नंतर कर्मचार्‍यांची हजेरी घेण्यासाठी असलेले मशीन त्यांनी फोडले. यावेळी उपस्थित कर्मचार्‍यांनी याची माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली. मात्र, नगरसेवक जाधव काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आरोग्य विभागाचे बहुतांश कर्मचारी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडून बसले. 

याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी उपस्थित कर्मचार्‍यांची मागणी होती. मात्र, गुन्हा दाखल करून घेण्यास अधिकारीच उपस्थित नसल्याने तणाव निर्माण झाला. अखेर पो.नि. सारंगकर यांनी समजूत घालत कर्मचार्‍यांशी चर्चा केली. काही वेळात डीवायएसपी शेख पोलिस ठाण्यात आले. मात्र, फिर्यादी सकटे अचानक गायब झाल्याने पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी सकटे पालिकेत असल्याचे समजल्याने काही कर्मचारी थेट पालिकेत गेले आणि सकटे यांना घेत तडक पोलिस ठाण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि. वर्षा डाळींबकर तपास करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.