Your Own Digital Platform

...तिचे आयुष्य अवघे दहा वर्षांचे!


कराडः जन्माला आल्यापासून तिने सर्वांचीच अगदी मनापासून सेवा केली. त्यामुळेच तर ‘ती’ सर्वांना आपली वाटत होती. मिळालेल्या केवळ दहा वर्षाच्या छोट्याशा आयुष्यात तिने स्वतःबरोबर गावचे नाव जगभर पोचविले. तिने आयुष्यभर आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले. तिच्या या प्रयत्नाला काही यशही आले. त्यामुळेच तिच्याभोवती लोकांचा गराडा पडू लागला. तिला गावासाठी, गावातील लोकांसाठी व आपल्यावर प्रेम करणार्‍या सर्वांसाठी खूप काही करायचे होते.

 पण सर्वाना सोडून तिला जावे लागले. आपले अपूर्ण राहिलेले काम मोठ्या बहिणीच्या खांद्यावर टाकून तिने स्वतःचे अस्तित्व संपवले. यापुढे ती नेहमीच जुन्या आठवणींच्या रुपात लोकांना स्मरणात राहील.गावचा इतिहास पाहिला तर तसा तो फार विचित्र आहे. गावची गरज म्हणून सुमारे 60 ते 65 वर्षांपूर्वी तिच्या लहान बहिणीचा जन्म झाला. गरज म्हणून जन्माला आलेल्या तिच्या लहान बहिणीने अतिशय प्रामाणिकपणे गावाची व गावातील लोकांची सेवा केली. 

लहान बहिणीच्या हातून झालेल्या चांगल्या कामामुळे तसेच लोकांना मिळत असलेल्या सोयीसुविधांमुळे लोकांचा तिच्या लहान बहिणीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यामुळे विविध ठिकाणाहून आलेले लोक गावात गर्दी करू लागले. वाढत्या गर्दीचा ताण लहान बहिणीला सण होईना. त्यातूनच मग वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दहा वर्षांपूर्वी 5 एप्रिल 2008 रोजी लहान बहिणीचे अस्तित्व संपवून तिचा जन्म झाला.

त्यावेळीही ती जन्मालाच येऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. तिच्या जन्मासाठी लोकांना न्यायालयाचा आधार घ्यावा लागला. न्यायालयाच्या सूचनेनुसार तिचा जन्म झाला. असे असलेतरी त्यावेळी अनेकांनी आपल्या राजकीय पदाचा त्याग करून ती जन्माला यावी म्हणून प्रयत्न केले होते. त्याचे फळही नंतर लोकांना मिळाले. तिचा जन्म झाल्यानंतर गावचा नव्याने विस्तार होऊ लागला.

हा विस्तार होत असताना तिने अतिशय महत्त्वकांक्षी व अनेक गावांना आदर्शवत अशी नळ पाणी पुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. ही योजना राबवत असताना 24 तास स्वच्छ व मुबलक पाणी आणि त्यातून वीज बचत करण्यात तिला प्रचंड यश आले. यातूनच तिने आपले व आपल्या गावाचे नाव जगभर केले. महाराष्ट्रासह परराज्यातून तिने राबवलेल्या नळपाणीपुरवठा योजनेसह विविध योजना पाहण्यासाठी लोक तिला व गावाला भेट देऊ लागले. याच दरम्यान सोलर सिटी, ग्रीन सिटी, आरोग्यदायी सिटी यासह लोकांना चांगल्या सुख सुविधा मिळव्यात म्हणून तिने अनेक उपक्रम हाती घेतले. हाती घेतलेले सर्व उपक्रम तिने यशस्वी करून दाखवले. आजही ते उपक्रम सुरू आहेत. आज तिचे अस्तित्व संपले असले तरी तिने राबवलेले उपक्रम भविष्यात अनेक वर्ष सुरू राहतील. गावासाठी, लोकांसाठी खूप काय करायचं होते, पण तिला मर्यादा होत्या.

तिचा आवाका लहान असल्याने ती लोकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी कमी पडू लागली. याची जाणीव तिला स्वतःला झाल्यानंतर तिने गावची जबाबदारी आपल्या मोठ्या बहिणीवर सोपवण्याचा निर्णय घेतला. लोकांनाही तसा विचार करायला तिने भाग पाडले. तिला मिळालेले अवघे दहा वर्षांचे आयुष्य तिने सत्कारणी लावले. अनेक वर्षे अस्तित्वात राहूनही जे काम केले जात नव्हते किंवा होत नव्हते अशी अनेक कामे तिने आपल्याला मिळालेल्या केवळ दहा वर्षाच्या आयुष्यात करून दाखवली. ‘किती वर्षे जगलो, त्यापेक्षा कसं जगलो... याला खूप महत्त्व आहे.

या म्हणीप्रमाणे तिला मिळालेले केवळ दहा वर्षांच्या आयुष्यात तिने खूप मोठे काम केले. हे कामच भविष्यात अनेक वर्ष लोकांच्या स्मरणात राहील. तिने राबवलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून यापुढेही ती लोकांच्या हृदयात कायम राहील. आज अस्तित्व राहिले नसले तरी तिने स्वतःला आपल्या मोठ्या बहिणीमध्ये सामावून घेतले आहे. तिने अस्तित्वात असताना राबवलेल्या योजना, उपक्रम, लोकांना सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी मोठ्या बहिणीवरती सोपवली आहे. 

तिने केलेल्या कार्याची व कामाची दखल घेऊन यापुढे नव्याने अस्तित्वात आलेल्या तिच्या मोठ्या बहिणीला तेवढ्याच ताकदीने काम करावे लागेल आणि ती करेल यामध्ये शंका नाही. आता तुम्हाला प्रश्‍न प्रडला असेल ती म्हणजे कोण? अहो, ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून मलकापूरकांची लाडकी ’नगरपंचायत’.